हा ‘आवाज’ दबलाच पाहिजे

रमेश डोईफोडे 
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. काळोख हटविणारा. पण अलीकडे अनेक सणांना अति उत्साही जनांच्या उपद्‌व्यापांमुळे गालबोट लागू लागले आहे. सण-उत्सवाच्या निमित्ताने आपला आनंद साजरा करताना, इतरांनाही त्यात सहभागी करून घ्यावे, किमान आपल्या आनंदाच्या कल्पनांमुळे त्यांना उपद्रव होऊ नये, याची काळजी घ्यावी, ही अपेक्षा अनाठायी नाही.

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. काळोख हटविणारा. पण अलीकडे अनेक सणांना अति उत्साही जनांच्या उपद्‌व्यापांमुळे गालबोट लागू लागले आहे. सण-उत्सवाच्या निमित्ताने आपला आनंद साजरा करताना, इतरांनाही त्यात सहभागी करून घ्यावे, किमान आपल्या आनंदाच्या कल्पनांमुळे त्यांना उपद्रव होऊ नये, याची काळजी घ्यावी, ही अपेक्षा अनाठायी नाही.

तथापि, त्याचे भान न राहिल्याने काही वेळा सणाच्या आनंदापेक्षा त्रास जास्त, अशी सर्वसामान्यांची अवस्था होऊ लागली आहे. फटाक्‍यांचा कानठळ्या बसविणारा आवाज, हे त्याचेच एक उदाहरण. अखेर सर्वोच्च न्यायालयाला यात लक्ष द्यावे लागले आणि रात्री आठ ते दहा या वेळेतच फटाके वाजविण्याचे बंधन घालण्यात आले. त्याचे पालन सरसकट सगळीकडे झाले, अशी म्हणण्याजोगी परिस्थिती नाही. पण हे निर्बंध आले, यातच समाधान मानणे पुरेसे आहे काय? 

फटाकेबाजांचा धुमाकूळ 
लग्नसमारंभ असो, त्यानिमित्ताने निघणारी वरात असो, वा गणेशोत्सव-दिवाळीसारखे सण. दणदणीत- कानठळ्या बसविणारा आवाज मग तो ध्वनिवर्धकांचा असेल, बॅंडचा असेल वा फटाक्‍यांचा... कानाला दडे बसल्याखेरीज कार्यक्रम साजरा झाल्यासारखे काहींना वाटतच नाही. आवाजाची उच्चतम पातळी हे आपल्या आनंदाचे परिमाण झाले आहे.

न्यायालयाने फटाके वाजविण्याच्या वेळेवर मर्यादा घातल्यामुळे या त्रासाला तोंड देण्याचा कालावधी कमी झाला आहे, एवढेच. प्रश्‍न अद्याप सुटलेला नाही. या दिवाळीत, विशेषतः लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री आठनंतर पुण्यातील बव्हंशी सर्व रस्त्यांवर फटाकेबाजांचा धुमाकूळ चालला होता.

सगळे रस्ते आणि परिसर फटाक्‍याच्या विषारी धुराने व्यापून गेला होता. त्या वातावरणात श्‍वास घेणेही मुश्‍कील झाले होते. त्याच काळात प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालकांची अवस्था काय झाली असेल? 

प्रबोधनाची गरज 
भररस्त्यात फटाके वाजविणे, हा बेजबाबदारपणा आहे. त्यावर कळस म्हणजे एखादे वाहन जवळ आल्यावर संबंधित चालकाला भेदरविण्यासाठी मुद्दाम त्या वेळी वात पेटविण्याचा मुहूर्त साधण्याचा होणारा प्रकार! अचानक मोठा आवाज झाल्यावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघातही संभवतात. परंतु लोकांची त्रेधा उडविणे, हाच उद्देश असलेल्या मंडळींना त्याची फिकीर नसते. पुण्यात बेसुमार वाहनांमुळे हवेच्या प्रदूषणाची पातळी मुळातच धोक्‍याच्या पातळीवर पोचली आहे. त्यात फटाक्‍यांच्या कर्णकर्कश आवाजात आणि जीवघेण्या धुरात सण शोधणाऱ्या मंडळींमुळे ही परिस्थिती अधिक बिघडत चालली आहे. न्यायालयाने कोणत्या गोष्टीत किती वेळा हस्तक्षेप करायचा, यालाही काही मर्यादा आहेत. त्यामुळे या विषयात व्यापक प्रबोधन होण्याची गरज आहे. फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा, असा संदेश अनेक शाळांत सध्या दिला जात आहे. पण त्याच शाळांतील विद्यार्थ्यांचे पालक जर घरी स्वतःच बाँब पेटवत असतील, त्या मुलांनी नेमका काय बोध घ्यायचा? 

..अशी ‘परंपरा’ काय कामाची? 
फटाकाप्रेमींना ध्वनी-वायुप्रदूषण या गोष्टी गौण वाटतात. फटाके वाजवून सण साजरा करणे, ही आमची परंपरा आहे, असा दावाही अनेक जण करतात. तथापि, पुराणातील गोष्टी बाजूला ठेवल्या, तर आपल्या आवाजाने इमारती हादरविण्याची क्षमता असलेल्या अत्याधुनिक ध्वनिवर्धक (स्पीकर) यंत्रणा, फटाक्‍यांचे बाँब, आकाशाला गवसणी घालणारे शोभेच्या दारूचे रॉकेट, हे शोधच मुळी अलीकडच्या काळातील आहेत. त्यामुळे त्यांच्या वापराची परंपरा प्राचीन आहे, असा दावा करणे हा भंपकपणा झाला. ही परंपरा असल्याचे चर्चेसाठी क्षणभर मान्य केले, तरी अशा ‘परंपरा’ जीवितालाच धोका निर्माण करू लागल्या असतील, तर त्या लोकप्रबोधनाने किंवा त्यात यश न आल्यास सक्तीने बंद करणे आवश्‍यक नाही काय? 

आनंद हवा, धसका नको! 
फटाक्‍यांची श्‍वास गुदमवणारी आतषबाजी आता असह्य झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. केवळ जमीनच नाही, तर आकाशही त्यातून बचावलेले नाही. न्यायालयाच्या आदेशामुळे या असह्यतेची तीव्रता कमी झाली आहे, ती संपलेली नाही किंवा सुसह्यतेच्या कक्षेत आलेली नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. हे चित्र बदलण्यासाठी न्यायालय, सरकार, प्रशासन यांनी कितीही प्रयत्न केले, तरी त्याला लोकसहभागाची जोड मिळाल्याखेरीज त्यात अपेक्षित यश येणार नाही. तसा संकल्प सगळ्यांनीच करण्याची गरज आहे. अन्यथा, यापुढे दिवाळीचा आनंद कमी आणि धसका जास्त, अशी वेळ येईल.

Web Title: Diwali Cracker Sound