आज दिवाळीचा पहिला दिवस; जाणून घ्या काय आहे आजचं महत्त्व?

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

आध्यात्मिक गुरूंना गुरूपौर्णिमेला वंदन करतो. आजचा दिन आपल्याला पशुत्वापासून मुक्‍त करून मनुष्यत्वाकडे जाण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंना वंदन करण्यासाठी आणि आपल्याला कुठल्याही प्रकारच्या बंधनात न राहता स्वतंत्रपणे जगायचे आहे, यासाठी गुरुंनी केलेले मार्गदर्शन विसरले जाऊ नये याची आठवण ठेवण्यासाठी.

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी गुरुद्वादशी, वसुबारस व धनत्रयोदशी असे तिन्ही सण साजरे करायला मिळत आहेत. काय आहे या तीन दिवसांचं महत्त्व?

गुरुद्वादशी

हा दिवस गुरूंची आठवण करण्याचा. गुरूपूजनासाठी गुरुपौर्णिमा व शिक्षकदिन असेही  दिवस आहेत. तरीही दिवाळीच्या पहिल्या दिवशी गुरूवंदन करण्याला वेगळे महत्त्व आहे. आजच्या या सणाला भारतीय संस्कारांचे महत्त्व लाभलेले आहे. आपल्याला ऐहिक जीवनात शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना शिक्षकदिनी वंदन करतो. आध्यात्मिक गुरूंना गुरूपौर्णिमेला वंदन करतो. आजचा दिन आपल्याला पशुत्वापासून मुक्‍त करून मनुष्यत्वाकडे जाण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंना वंदन करण्यासाठी आणि आपल्याला कुठल्याही प्रकारच्या बंधनात न राहता स्वतंत्रपणे जगायचे आहे, यासाठी गुरुंनी केलेले मार्गदर्शन विसरले जाऊ नये याची आठवण ठेवण्यासाठी.

वसुबारस

Image result for vasubaras

आपल्यातील पशुत्वही सात्त्विक व्हावे, त्याची पूजा व्हावी या हेतूने घरातीलच एक होऊन गेलेल्या, बालकांना अमृतमय दूध, दही, तूप देऊन जीवन फुलवायला, मोठे व्हायला मदत करणाऱ्या गाईची आठवण ठेवून तिचे पूजन करायचे असते आज. वसुबारसला `गोवत्स द्वादशी` असेही म्हणतात. `वसु` या शब्दाचा एक अर्थ आहे `द्रव्य` (धन) आणि त्यासाठी असलेली `बारस` म्हणजे `द्वादशी`. गोधनाविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस असतो. समुद्रमंथनातून आलेल्या नंदा नामक कामधेनूसाठी हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. काही स्त्रिया या दिवशी एकभुक्त राहतात. या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. सायंकाळी सवत्सधेनूची पूजा करून गोठ्यातील गोधन वाढो आणि भरपूर कृषी उत्पादन होवो, अशी प्रार्थना करतात. कोकणात आज गुरांना आंघोळ केली जाते. स्त्रियांना आणि नेहमीच्या गुराख्याला आज गोठ्यातील कामांसाठी सुट्टी दिली जाते. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत.  

कशी करतात पूजा?
आपली संस्कृती कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष. रानात गुरे चरून गोठ्यात परतण्याच्या वेळी म्हणजे संध्याकाळी गाईची वासरासह पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. स्त्रिया गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी व अन्य पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. गाय ही नंदा कामधेनू असल्याने, धन-धान्य भरपूर येवो, मुलेबाळे सुखी राहोत यासाठी तिची प्रार्थना करतात. या सायंकाळपासून अंगणात रांगोळी काढण्यास आणि दारात दीप, आकाशकंदील उजळण्यास सुरुवात करतात.

धनत्रयोदशी
आज धनत्रयोदशीही आहे. धनत्रयोदशीला धनाची म्हणजे पैशांची पूजा केली जाते. (लक्ष्मीपूजनाला मुख्यतः सोन्याची पूजा केली जाते.) व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते. आज संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाईल. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याचा प्रघात आहे. समुद्रामंथनाच्या वेळी धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला तो हा आजचा दिवस. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. म्हणून या दिवसास `धन्वंतरी जयंती` असेही म्हणतात. धन्वंतरी ही आपल्या आरोग्यासाठी मार्गदर्शन करणारी देवता. जलौका, अमृतकलश, शंख, चक्र आदी धन्वंतरींच्या हातात असलेली साधने जीवनाला सुखी करण्यासाठी, शरीराच्या आरोग्याबरोबरच मानसिक व आध्यात्मिक पातळीवर आरोग्य नीट राहण्यासाठी मदत करणारी आहेत. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर देतात. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधी होण्याचा संभव नाही, अशी समजूत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: diwali festival 2019 dhantrayodashi vasubaras information marathi