Pune : भाव घटल्याने सोने खरेदीत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune gold

Pune : भाव घटल्याने सोने खरेदीत वाढ

पुणे : दिव्यांचा, भेटवस्तूंचा, विद्युत रोषणाईचा तसेच उत्साह आणि जल्लोषाचा सण म्हणजेच दिवाळी. त्यात सोने-चांदीचे भाव कमी झाल्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने सराफ बाजारपेठांमध्ये सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करण्यासाठी लगबग वाढली आहे. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून अनेकजण ही खरेदी करत आहेत.

किरकोळ बाजारात शनिवारी २२ कॅरेट सोने ४७ हजार ६३० आणि २४ कॅरेट सोने ५० हजार ७७० प्रति १० ग्रॅम होते. त्याचबरोबर चांदी ५८ हजार २०० रुपये किलो होती. याबाबत पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले, ‘‘जागतिक पातळीवरील अस्थिरता, रशिया-युक्रेन किंवा चीन-तैवान या ताणतणावाचा परिणाम सोन्याच्या भावावर होऊ शकतो. ही परिस्थिती चिघळत गेल्यास सोन्याचे भाव पुन्हा वाढतील. मात्र, आता सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे नागरिकही सोन्याची खरेदी करत असून गुंतवणुकीवर भर देत आहेत. भारतामध्ये सध्या तरी मंदीचे वातावरण नाही, त्यामुळे ग्राहकांना संधी मिळाली असून ते उत्साहाने सोने खरेदी करत आहेत. त्यामुळे बाजारात चांगली स्थिरता असून खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

महिन्यानंतर भाववाढीची शक्यता

आता सोने-चांदीचे भाव या सीजनमधील नीचांकी आहेत. सध्याची परिस्थिती पाहता या खाली भाव येतील, अशी शक्यता कमी आहे. येत्या एक-दीड महिन्यात अमेरिकेला बँक व्याजदर कमी करावे लागतील, त्यानंतर सोन्याचे भाव पुन्हा वाढू शकतात. त्यामुळे नागरिकांनी प्रत्येक महिन्याला जमेल तसे थोडे-थोडे सोने खरेदी करावे. कारण, येत्या काळात सोने-चांदीचे भाव वाढतील, असे डॉ. गाडगीळ यांनी सांगितले.

रत्न खरेदीलाही प्रतिसाद चांगला

दोन वर्षाच्या खंडानंतर ग्राहकांमध्ये हिरे आणि रत्न खरेदीसाठी उत्साह वाखणण्याजोगा होता. दिवाळीत नाजूक, सुबक आणि नाविण्यपुर्ण हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीकडे ओढा वाढला असून, रत्नांच्या खरेदीसाठी मागणी वाढली आहे. गत काही वर्षांत हिरे खरेदीकडे वाढ झाली आहे, असे हिऱ्यांच्या दागिन्यांचे व्यवसायिक नरेश लाटे यांनी सांगितले.

दर कमी झाल्यामुळे सोने व चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीला ग्राहकांचा अप्रतिम प्रतिसाद मिळत आहे. त्यात दिवाळी हा सणात अशा प्रतिसादामुळे नक्कीच सराफ बाजारपेठ उजळली आहेत. सोन्याबरोबर चांदीच्या वस्तू दागिने यांची खरेदी केला जात आहे. दरम्यान यापेक्षा अजून दर घसरण्याची शक्यता कमी आहे.

- फत्तेचंद रांका, व्यवस्थापकीय संचालक -रांका ज्वेलर्स

सोन्याचे भाव कमी का झाले?

सध्या डॉलर इंडेक्स वाढला आहे

अमेरिकेने बँकेचे व्याजदर वाढविले

जागतिक स्तरावरील घडामोडींचा परिणाम

सोने-चांदीचे सरासरी भाव (एप्रिल ते ऑक्टोबर) (रुपये)

महिना २२ कॅरेट २४ कॅरेट चांदी (किलो)

एप्रिल ४९३१० ५२५३० ६८६००

मे ४९१७० ५२३८० ६५०००

जून ४८३१० ५१४६० ६२३००

जुलै ४९५०० ५२७२० ६०४००

ऑगस्ट ४८६५० ५१८६० ५९५००

सप्टेंब ४७५५० ५०६८० ५३३००

ऑक्टोबर ४७६३० ५०७७० ५८२००