आजोबांच्या शेतात दिवाळीची धमाल 

Diwali in grandfathers farm
Diwali in grandfathers farm

पुणे - खेडेगावातले आजोबा दिवाळीची गाणी गात होते. त्यांच्याभोवती जमलेल्या मुलांनाही गायला लावत होते. गुंजन आणि गार्गी या मुलींनी दिवाळीच्या सुटीत पारंपरिक लोकगीते शिकण्याचा विरळा आनंद अनुभवला. 

गुंजन म्हणाली, "आमचे आजोबा त्यांच्या शेतातल्या बैलांशी कसं मित्रासारखं बोलतात आणि बैलही त्यांना छान प्रतिसाद देतात, याचं आश्‍चर्य वाटत होतं. घरात चकल्या, शेव, चिवडा, लाडू वगैरे फराळ तयार करायला आम्ही सुद्धा मदत केली. मैद्याच्या कापण्या (शंकरपाळी) करायला आम्ही शिकलो.'' 

गार्गी सांगत होती, "दिवाळीची सुटी सुरू झाली आणि बाबांनी आम्हाला त्यांच्या आई-बाबांकडे नेलं. माझी बहीण गुंजन आणि मी तिथल्या शेतात खूप मजा केली. चुलत बहीण, गावातली दुसरी मुलं अन्‌ आम्ही तिथं झाडांवर चढायचो. वसुबारसेच्या दिवशी आजी, काकूंनी घरातल्या गाईंची पूजा केली. गंमत म्हणजे आजोबांनी गाईसाठीचं गाणं आम्हाला शिकवलं. ते मला फार आवडलं. आता इथं पुण्यातल्या मैत्रिणींना मी ते शिकवणार आहे.'' 

पुण्यापासून 125 किलोमीटर दूर अंतरावरचं सुरोडी हे गाव (ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) गार्गी आणि गुंजनच्या बाबांचं गाव. दोघींनी सांगितलं, की आमचे बाबा अशोक रूपनेर उन्हाळा आणि दिवाळीच्या सुटीत आम्हाला या गावात आणतात. पुण्यात नेहमीच केवढी तरी वाहनं, गर्दी, गलका असतो. सुरोडीत आम्हाला भरपूर फिरता येतं. चिक्कार खेळता येतं. इथं पाऊस फार कमी असतो ना म्हणून जेव्हा कधी पाऊस येईल तेव्हा ते पाणी साठवून ठेवतात. पाण्याचा काटकसरीनं वापर करायला आम्ही इथंच शिकलो. बाबा वाया गेलेल्या वस्तूंपासून खेळणी बनविण्याच्या कार्यशाळा सर्वदूर घेतात. सुरोडीतल्या मुलांना ही खेळणी तयार करून दाखवणं आणि त्यांच्यामागचं विज्ञान ते सांगणं हे त्यांना आवडतं. काही खेळणी आम्ही दोघी करून दाखवतो तेव्हा आजी-आजोबा आमची पाठ थोपटतात. 

आता आम्ही सोलापूरच्या आजीकडे (आईची आई) जाणार आहोत. ती आजी डाळीच्या पिठाचं गोड करदंट हा आम्हाला आवडणारा खाऊ करणार आहे. अनारसे करायला तिथं आम्ही आईला मदत करणार आहोत. तपकिरी रंगाचा अनारसा, त्याच्यावर पांढरे खसखशीचे दाणे किती मस्त दिसतात. तिथं आजीला आम्ही तिच्या लहानपणीच्या गोष्टी विचारायचं ठरवलं आहे, असा बेत दोघींनी सांगितला.


Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com