बारामतीत दिवाळीची सुरवात संगीतमय!

बारामतीत दिवाळीची सुरवात संगीतमय!

बारामती शहर : दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सुरवात संगीतमय झाल्याने रसिक बारामतीकरांचा आनंद द्विगुणित झाला. पवार सार्वजनिक न्यासाच्या वतीने आयोजित शारदोत्सवात पहिल्या दिवशी अश्विनी पवार कार्तिकेयन व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार पी.टी. नरेंद्रन यांच्या भरतनाट्यमच्या विविध नृत्यप्रकारांनी बारामतीकरांना मंत्रमुग्ध केले. शारदोत्सवाचे यंदाचे पंधरावे वर्ष आहे. 

अलारिपूने कालच्या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. कळीचे रुपांतर जसे फुलात होते तसे नर्तक स्वताःचे नृत्य फुलवत ते पूर्णत्वाला पोहोचवितात अशी सुंदर संकल्पना यात होती. खंडत्रिपुट या नवतालात अलारिपू बांधला होता. त्या नंतर अश्विनी पवार यांनी मा मोहलागिरी मिरु दे...या तमीळ काव्यावर स्वरजती हा नृत्यप्रकार सादर केला. नृत, नृत्य व नाट्य यांनी परिपूर्ण असा नर्तकीची परिक्षा घेणारा हा नृत्य प्रकार अश्विनी यांनी सुंदररितीने सादर करीत रसिकांची दाद मिळविली. 

त्या पाठोपाठ कालिदासाच्या कुमारसंभव या महाकाव्यातून निवडलेल्या कवितेवर पी.टी. नरेंद्रन यांनी राग बिभासमधील रचनेवर नृत्यप्रकार सादर केला. तमिळनाडूतील लिला सॅमसंग यांनी याचे नृत्यदिग्दर्शन केले होते. 

त्या नंतर चलिये कुंजन मोर या गीतावर अश्विनी यांनी नृत्य सादर केले. त्रावणकोरचे महाराजा स्वाती तिरुनाल यांचे हे गीत होते. त्यांनी चारशेहून अधिक काव्यांची रचना केली. ती आजही आवर्जून भरतनाट्यममध्ये वापरली जातात. या कार्यक्रमाचा शेवट अत्युच्च आनंद देणा-या तिल्लाना या पी.टी. नरेंद्रन व अश्विन पवार यांच्या हिंदुस्थानी क्लासिकल कथ्थक या नृत्यप्रकाराने झाला.  आठ मात्रांच्या आदीतालात व राग धनश्रीमध्ये बांधलेली ही रचना स्वाती तिरुनाल यांनी लिहून संगीतबध्द केलेली होती. डॉ. रजनी इंदुलकर यांनी या संपूर्ण कार्यक्रमांची संकल्पना रसिकांपुढे उलगडली. 

उत्तरार्धात पुण्याच्या मराठी कलाकारांनी अस्सखलित उर्दूमध्ये सादर केलेल्या सुखन या वेगळ्या कार्यक्रमांनी रसिकांची मने जिंकून घेतली. उर्दू शेरोशायरी, गझल, कव्वाली असे प्रकार यात सादर केले गेले. नुसरत फते अली खान यांच्यापासून प्रेरणा घेत ओम भुतकर व नचिकेत देवस्थळी यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने हा एक वेगळा कार्यक्रम तयार केलेला आहे. यात जयदीप वैद्य, अभिजित ढेरे व मुक्ता जोशी यांनी गायन सादर केले त्यांना देवेंद्र भूमे, मंदार बगाडे व केतन पवार यांनी वाद्यांची साथ दिली. महेश तपे, सुधीर फडतरे व सौमित्र कुलकर्णी यांनी नेपथ्य, कुशल व भैरवी खोत यांनी व्यवस्थापन केले. 

खासदार सुप्रिया सुळे व अँड. ए.व्ही. प्रभुणे यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ नेते शरद पवार, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com