दाहकता शमविण्यासाठी उपयुक्त साळीच्या लाह्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 ऑक्टोबर 2016

धार्मिक परंपरा असल्याने लाह्या, बत्तासे, साखरेची चित्रे दिवाळीला विकतो. व्यापारी मंडळी तसेच विविध समाजाच्या नागरिकांकडे घरच्या पद्धतीनुसार पूजेकरिता या वस्तू लागतात. दिवाळीत व्यवसायामुळे वेळ मिळत नाही म्हणून आम्ही घबाड षष्ठीला लक्ष्मीपूजन करतो.

- मारुती ढेंबे, विक्रेते

पुणे : शरद ऋतूतील दाहकता शमविण्यासाठी उत्तम असल्यानेच साळीच्या लाह्या दिवाळीतील लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या पूजेला ठेवल्या जातात. मात्र, त्याचा आयुर्वेदिक उपयोग लक्षात घेऊन त्याचा खाण्यासाठी फारसा वापर होत नाही. त्यामुळे हा प्रसाद सेवन केल्याने उत्तम आरोग्य लाभेल, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत. 

लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदा अर्थात दिवाळीच्या पाडव्याला वही पूजनाकरिता साळीच्या लाह्या वापरण्याची परंपरा आहे. दिवाळीनिमित्त छत्तीसगड आणि कर्नाटकातून लाह्यांची दरवर्षी मोठ्या प्रमाणात आवक होते. मात्र, केवळ धार्मिक परंपरा म्हणून पूजेकरिता लाह्या वापरतात असे नव्हे, तर शरद ऋतूत उद्‌भवणारा पित्ताचा त्रास त्याने कमी होतो. तसेच रक्तदाब नियंत्रण आणि मूत्रपिंडाच्या विकारांवरही साळीच्या लाह्या उपयुक्त आहेत. 

ताराचंद रुग्णालयाचे कार्यकारी विश्‍वस्त डॉ. सुहास परचुरे म्हणाले, ""साळीच्या लाह्यांमध्ये साखरेचे प्रमाण अत्यल्प असते. त्या पचायलाही हलक्‍या असतात. लहान मुलांच्या शारीरिक वाढीकरिताही या लाह्या उपयुक्त असून, मूत्रपिंडाचे विकार, रक्तदाबावर नियंत्रण आणि पित्त शमविण्याकरिताही लाह्यांचा उपयोग होतो.'' 

धार्मिक परंपरांनुसार सण आणि त्या वेळी बनविण्यात येणाऱ्या पदार्थांना निराळेच महत्त्व आहे. साधारणतः हिवाळ्याच्या सुरवातीला साळीच्या लाह्यांचे उत्पादन मुबलक प्रमाणात होते. पूजाविधीमध्ये या लाह्यांचा उपयोग होतो. धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत नागरिकांच्या घरी धार्मिक कार्यक्रम आयोजिण्यात येतात. तेव्हा साळीच्या लाह्या हमखास वापरण्यात येतात. साहजिकच उत्पादकांकडून मुबलक प्रमाणात लाह्यांचे उत्पादन होते. पूजेकरिता वीस हजारांहून अधिक पोती लाह्यांची आवक झाली आहे. यानिमित्ताने घाऊक व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांना रोजगारही मिळत आहे. 

लाह्या, बत्ताशांचे उत्पादन आणि विक्री करीत असल्याने घबाड षष्ठीला लक्ष्मीपूजन करण्याची पद्धत असल्याचे भेळविक्रेते-मिठाईवाले सांगतात. साळीच्या लाह्यांनी मार्केट यार्ड, भवानी पेठ, नाना पेठेतील दुकाने सजली आहेत, तर महात्मा फुले मंडई; तसेच शहर व उपनगरांतही पथारीवाल्यांनी लाह्या, बत्तासे आणि साखरेची चित्रे विक्रीकरिता पथाऱ्या मांडल्याचे पाहायला मिळत आहे. 

साळीच्या लाह्यांच्या घाऊक व्यापारी रंजना मुनोत म्हणाल्या, ""छत्तीसगड येथील राजनांद येथे साळीच्या लाह्यांचे उत्पादन करणारे कारखाने आहेत. वर्षभर तेथे लाह्या, दगडी आणि भाजक्‍या पोह्यांचे उत्पादन होते. दसऱ्यानंतर तेथे भाताच्या पिकाची कापणी होते. त्यापासून साळीच्या लाह्या तयार करतात. त्यामध्ये मीठ आणि साखरेचे प्रमाणही तुलनेने मर्यादित असते. या लाह्या महिनाभर टिकू शकतात. नैसर्गिकदृष्ट्या आरोग्यासही त्या उपयुक्त असतात. सण आणि उत्सवांची अनेक वर्षांच्या परंपरेनुसार दिवाळीत लाह्या पूजनास वापरण्याची पद्धत आहे.'' 

Web Title: Diwali preparations are in full swing in Pune