खरेदीच्या उत्साहामुळे बाजारपेठा फुलल्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

शहरातील लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, बोहरी आळी, शिवाजी रस्ता यासह अन्य बाजारपेठांमध्ये नागरिक कुटुंबासह खरेदीसाठी येतात. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर शनिवार ते सोमवार तीन दिवस लागोपाठ सुट्ट्या आल्यामुळे नागरिक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याचे चित्र होते.

पुणे -  दिवाळीचा सण तोंडावर आल्याने नागरिक आता खरेदीसाठी घराबाहेर पडू लागले आहेत. पावसाने उघडीप दिल्याने बुधवारी दुपारनंतर शहरातील बाजारपेठा फुलल्या आहेत. परिणामी मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्रही पाहावयास मिळाले. पावसाच्या वातावरणामुळे खरेदीवर परिणाम होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

शहरातील लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, बोहरी आळी, शिवाजी रस्ता यासह अन्य बाजारपेठांमध्ये नागरिक कुटुंबासह खरेदीसाठी येतात. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर शनिवार ते सोमवार तीन दिवस लागोपाठ सुट्ट्या आल्यामुळे नागरिक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याचे चित्र होते. मंगळवारी मात्र पावसामुळे बाजारपेठांतील गर्दी कमी झाल्याचे दिसून आले. दिवाळी तोंडावर आल्याने बुधवारी पुन्हा नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. परिणामी मध्यवर्ती भागातील रस्त्यांवरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. पुढील दोन- तीन दिवसांमध्ये खरेदीत वाढ होण्याचा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. यंदा दिवाळीच्या खरेदीत घट झाल्याचे सांगण्यात आले. विद्युत साहित्यासह पारंपरिक पूजेच्या साहित्याच्या खरेदीवरही पावसाचा परिणाम झाला असून त्याचा फटका किरकोळ विक्रेत्यांना बसत असल्याचे सांगण्यात आले. विद्युत साहित्याचे विक्रेते नेमचंद गड्डा म्हणाले, ‘‘शहरात पडणाऱ्या पावसाचा फटका विक्रीवर झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रीमध्ये सुमारे ३० टक्के घट झाली आहे.’’

बाजारात आकर्षक वस्तू उपलब्ध असून विविध प्रकारच्या आकाशकंदिलांनी परिसराची शोभा वाढवली आहे. पावसाने उघडीप दिल्याने नागरिक आता खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. दिवाळीच्या खरेदीचा आनंद अवर्णनीय असतो.
- सोनाली भदारके, ग्राहक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali shopping in pune

टॅग्स
टॉपिकस