पुणे-दौंड मार्गावर ‘डीएमयू’ यशस्वी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

रेल्वे प्रवाशांची गैरसोय दूर होण्याची चिन्हे

पुणे - चेन्नई येथून रेल्वेच्या पुणे विभागात दाखल झालेल्या नव्या कोऱ्या ‘डीएमयू’ची (डिझेल मल्टिपल युनिट) पुणे-दौंड मार्गावर मंगळवारी घेण्यात आलेली चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. सकाळी साडेसात वाजता पुणे स्टेशन येथून सुटलेली ही गाडी दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी दौंडला जाऊन पुन्हा पुण्यात दाखल झाली.

रेल्वे प्रवाशांची गैरसोय दूर होण्याची चिन्हे

पुणे - चेन्नई येथून रेल्वेच्या पुणे विभागात दाखल झालेल्या नव्या कोऱ्या ‘डीएमयू’ची (डिझेल मल्टिपल युनिट) पुणे-दौंड मार्गावर मंगळवारी घेण्यात आलेली चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. सकाळी साडेसात वाजता पुणे स्टेशन येथून सुटलेली ही गाडी दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी दौंडला जाऊन पुन्हा पुण्यात दाखल झाली.

पुणे-दौंड मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले. त्यामुळे या मार्गावर उपनगरीय प्रवासी सेवा सुरू करण्याची गेल्या काही वर्षांपासूनची मागणी पूर्ण होण्याची चिन्हे निर्माण झाली होती. या कामाची रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांनी नुकतीच पाहणी करून सेवा सुरू करण्यास मान्यता दिली होती. मात्र या मार्गावर लोकलची (ईएमयू-इलेक्‍ट्रिक मल्टिपल युनिट) सेवा सुरू करण्यासाठी अनेक अडथळे असल्याने, ती लगेच सुरू करणे शक्‍य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र त्याऐवजी ‘डीएमयू’सारखी उपनगरीय सेवा सुरू करता येईल, असे सूतोवाच त्यांनी केले होते. त्यानुसार चेन्नई येथून रेल्वे बोर्डाकडून ‘डीएमयू’ ही गाडी मध्य रेल्वेला उपलब्ध करून देण्यात आली.

आज सकाळी साडेसात वाजता पुणे स्टेशनवरून ‘डीएमयू’ गाडी दौंड जंक्‍शनकडे निघाली. सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी ती दौंड स्टेशनला पोचली. तर दौंड येथून दहा वाजून २० मिनिटांनी सुटल्यानंतर ती गाडी सव्वाबारा वाजता पुण्यात पोचली. साधारणपणे पॅसेंजर गाडीला हे अंतर कापण्यासाठी दीड ते पावणेदोन तास लागतात. एक्‍स्प्रेस गाडीला एक ते सव्वा तास लागतो. मात्र ‘डीएमयू’ प्रत्येक स्टेशनवर थांबल्याने जास्त वेळ लागला. ‘ईएमयू’ गाडी विजेवर चालते, तर ‘डीएमयू’ डिझेलवर चालते हा या दोन गाड्यांमधील फरक आहे. यामध्ये ‘ईएमयू’च्या एका डब्याला दोन्ही बाजूला दोन असे चार दरवाजे असतात. तर, ‘डीएमयू’ला दोनच दरवाजे आहेत. 

या दोन्ही गाड्यांना दोन्ही टोकांना इंजिन आहे. तर प्रत्येक डब्यात बायोटॉयलेट, पंखे, चढण्या-उतरण्यासाठी पायऱ्या, दाराला दोन हॅंडल, खिडक्‍यांना ॲडजस्टेबल काचा, माहिती फलक, लाउडस्पीकर आहेत. दोन्ही बाजूंचा इंजिनच्या मागील डबा महिला प्रवाशांसाठी राखीव, एका डब्यात १०८ प्रवाशांची बसण्याची आणि १३० प्रवाशांच्या उभे राहण्याची क्षमता आहे.

नव्याने दाखल झालेल्या गाडीच्या साह्याने पुणे-दौंड मार्गावर तातडीने उपनगरीय सेवा सुरू करण्यात यावी. पुणे-लोणावळा लोकलच्या धर्तीवर दौंड मार्गावर तिकीटदर निश्‍चित करावे. या गाडीच्या साह्याने दिवसभरात एकूण सहा फेऱ्या होऊ शकतात. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय टाळण्यास काही प्रमाणात मदत होईल. या गाडीला घोरपडी, मगरपट्टा, खराडी, सिरम, मुंढवा, लोणी काळभोर, थेऊर आदी ठिकाणी नव्याने थांबा घ्यावा. या गाड्यांमध्ये चढ-उतारासाठी पायऱ्या असल्याने हे नवीन थांबे घेताना त्या ठिकाणी सध्या स्टेशन विकसित होण्याची आवश्‍यकता नाही. 
- हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप

Web Title: dmu success in pune daund route