हरियानातील मानवी सांगाड्यात "डीएनए' 

DNA
DNA

पुणे - हरियानामधील राखीगडी येथील दफनभूमीत केलेल्या उत्खननात इ. स. पूर्व चार हजार ते साडेपाच हजार वर्षांपूर्वीचे मानवी सांगाडे सापडले होते. यापैकी दोन सांगाड्यातून "डीएनए' मिळाले आहेत. यावरून हडप्पन लोक कोण होते, तत्कालीन लोकांचे संबंध कसे होते, सध्याचे लोक हे हडप्प लोकांचे वंशज आहे का, याची माहिती मिळणार आहे. "डीएनए'वरून हडप्पन व्यक्तीची शरीरयष्टी, वर्ण, डोळे, केस असलेली प्रतिकृती तयार केली जाणार आहे. त्यामुळे प्रथमच सिंधू संस्कृतीतील मानव कसा होता, हे जगासमोर येणार असल्याची माहिती डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी दिली. 

डॉ. शिंदे म्हणाले, ""राखीगडीचा परिसर चारशे हेक्‍टरचा आहे. तो पाकिस्तानातील मोहेंजोदडोपेक्षा शंभर हेक्‍टरने अधिक असल्यामुळे भारतीय उपखंडातील सर्वांत मोठ्या उत्खननाच्या ठिकाणाची नोंद करण्यात आली आहे. यातील एका टेकाडीवरील दफनभूमीत दोन सुस्थितीतील (स्त्री आणि पुरुष) सांगाडे सापडले होते. या सांगाड्यातून "डीएनए' मिळविले आहे. ही एक मानवी इतिहासातील क्रांती आहे. कोरियन अभ्यासकांच्या मदतीने "डीएनए'वरून इ. स. पूर्व साडेचार हजार ते साडेपाच हजार वर्षांपूर्वीचा मानव कसा होता, हे शोधणे सोपे होणार आहे. एवढेच नसून त्यांनी तयार केलेल्या सॉफ्टवेअरमुळे डीएनएच्या आधारे हडप्पन लोक कोण होते, तत्कालीन लोकांचे संबंध कसे होते, सध्याचे लोक हे हडप्प लोकांचे वंशज आहेत का, याची माहिती मिळणार आहे. 

सिंधू संस्कृतीचा कालखंड हा इ. स. पूर्व साडेचार ते साडेपाच हजार वर्षांपूर्वीचा आहे. यामध्ये सिंधू संस्कृतीची सुरवात, भरभराट आणि समाप्ती कशी झाली, याचे नेमके उत्तर अद्याप सापडलेले नाही. राखीगडी येथील उत्खननातून याची उत्तरे सापडत असल्याचे सांगून डॉ. शिंदे म्हणाले, ""येथील उत्खननात मातीची व तांब्याची भांडी, ठसे व दागिने सापडले आहेत. यांसह सांडपाणी वाहिन्या, न्हाणीघर आणि भाजलेल्या विटा मिळतात. या ठिकाणातून काही हजार वर्षांपूर्वी सरस्वती नदी वाहत असल्यामुळे गगरखोर अस्तित्वात आले होते. त्यामुळे राखीगडी हे हडप्पा व मोहेंजोदडोपेक्षा जुनी संस्कृती असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नव्याने केलेल्या उत्खननावरून येथील जीवनमान कळू शकणार आहे. याबरोबरच येथील मानवाच्या विकासातील महत्त्वाच्या टप्प्यांचाही अभ्यास करता येणार आहे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com