पुण्यात नेमके कोण पुढे? भाजप की राष्ट्रवादी?

ज्ञानेश्‍वर बिजले
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

पुणे महापालिका निवडणुकीतील विधानसभा मतदारसंघनिहाय शक्यता अशाः

  • पुणे महापालिका क्षेत्रात एकूण विधानसभा मतदारसंघ आहेत आठ
  • कसबा पेठ, कोथरूड, शिवाजीनगर, पर्वतीत भाजप आघाडीवर
  • खडकवासला, वडगाव शेरी, हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर
  • पुणे कॅन्टोनमेंटमध्ये काँग्रेस अन्य पक्षांच्या पुढे राहण्याची चिन्हे

पुण्यात भारतीय जनता पक्ष सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्नशील असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेस हाच पुढे राहील, अशी चिन्हे दिसत आहेत. या दोन्ही पक्षांतील अंतर मात्र खूप कमी असेल. पुण्यात त्रिशंकू स्थिती राहील. कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळण्याची शक्‍यता नसल्याने पुण्याची सत्ता कोणाच्या हाती जाईल, ते तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेना व काँग्रेसच्या पारड्यात किती जागा पडतील, त्यावरच ठरेल. त्यामुळे पुण्यातील सत्तेच्या चाव्या शिवसेना किंवा काँग्रेस यांच्या हातात राहतील. 

लोकसभा निवडणुकीत निर्माण झालेल्या मोदी लाटेच्या प्रभावाखाली विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यामुळे पुण्यातील आठही जागा भाजपने जिंकल्या. सव्वा दोन वर्षांपूर्वीची मोदी लाट आता किती शिल्लक आहे, त्यावर भाजपचे महापालिका निवडणुकीतील भवितव्य अवलंबून राहील. मोदी लाट पूर्णपणे ओसरलेली नाही, हेही तितकेच खरे. त्या लाटेचा सुप्त प्रभाव या निवडणुकीतील मतदानावर कितपत पडेल, यावरच भाजपची गणिते अवलंबून आहेत. 

महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 52 तर भाजपला 26 जागा मिळाल्या. अन्य पक्षांत 74 जागा विभागल्या गेल्या. गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा दहा जागा वाढल्या आहेत. यावेळी चार नगरसेवकांचा प्रभाग झाल्याने, छोट्या भागावरील प्रभावाने निवडून येणाऱ्या नगरसेवकांपुढे अडचण निर्माण झाली. त्यामुळे, केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजप आणि महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी यांच्यातच प्रमुख लढत रंगली. अन्य पक्ष त्यांच्या प्रभावक्षेत्रापुरते मर्यादित राहिले. त्याचा परिणाम होऊन, अन्य पक्षातील नगरसेवकांचा ओढा या दोन मुख्य पक्षांकडे राहिला. 

राष्ट्रवादी काँग्रेसकडे नंतर आलेल्या नगरसेवकांसह 55 नगरसेवक असल्याने, त्यांना उमेदवारांची निवड करताना तुलनेने सोपे गेले. त्यातच अन्य पक्षांतील नगरसेवकांना प्रवेश देताना, उमेदवार निवडताना अजित पवार यांनी थेट लक्ष घातल्याने त्यांचे प्रभागातील पॅनेल जास्त मजबूत बनले. भाजप- शिवसेना युती तुटताना मुंबईत गोंधळ सुरू असताना, काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीची चर्चा झाली. शंभर जागांवर आघाडी झाली. त्याचा फायदा त्यांना मिळेल. ज्या भागात या दोन पक्षांचेच वर्चस्व आहे, तेथे त्यांना भाजपला सामोरे जाणे सोपे ठरत आहे. 

त्याउलट भाजपची स्थिती झाली. त्यांच्याकडे सक्षम उमेदवारांची संख्या कमी असल्याने अन्य पक्षांतील नगरसेवक, कार्यकर्ते घेत त्यांनी सक्षम पॅनेल तयार केली. मात्र, उमेदवार निवडताना स्थानिक नेत्यांपेक्षा बाहेरील हस्तक्षेप काही प्रभागात झाला. त्यामुळे काही नेते, कार्यकर्ते दुखावले. गुंडगिरीबाबत भाजपवर होणारी टीका त्यांच्या पारंपरिक मतदारांना फारशी रुचणारी नाही. त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक पूर्ण ताकदीने प्रचारात उतरणार नसल्याची चर्चा रंगू लागल्या. विधानसभा निवडणुकीला भाजप ताकदीने व नियोजनबद्धरित्या सामोरा गेला, तसे प्रचारातील नियोजन सध्या दिसत नाही. त्याची गती मंदावली आहे. 

विधानसभा मतदारसंघ निहाय चित्र पाहिल्यास, कसबा पेठ, कोथरूड, शिवाजीनगर आणि पर्वती येथे भाजप पुढे राहील, तर खडकवासला, वडगावशेरी, हडपसर या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर राहील. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात काँग्रेस इतरांपेक्षा पुढे राहण्याची शक्‍यता आहे. मात्र, भाजपचा प्रभाव असलेल्या मतदारसंघातील प्रभागांची संख्या कमी आहे. 

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कसबा पेठ मतदारसंघांत भाजपने यंदा पाच नगरसेवकांना उमेदवारी नाकारत नव्या चेहऱ्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले. येथे पाच प्रभाग असून, निम्म्याच्या आसपास जागा भाजपच्या पारड्यात पडतील, अशी चिन्हे आहेत. कोथरूड मतदारसंघात मात्र भाजपच्या जागा गेल्या निवडणुकीच्या तुलनेत चांगल्या वाढतील. त्या भागातील मनसेच्या काही जागा यावेळी भाजपकडे वळतील. तेथे पाच प्रभाग आहेत. पर्वती मतदारसंघात सहा प्रभाग असून, तेथेही भाजपच्या जागा सध्याच्या तुलनेत वाढतील. तर, शिवाजीनगर मतदारसंघात तीन प्रभाग असून, तेथे गेल्या वेळी भाजपचा एकच नगरसेवक निवडून आला. यावेळी, तेथे निम्म्या जागा भाजपला मिळण्याची शक्‍यता आहे. या चार मतदारसंघात वीस प्रभाग आहेत. गेल्या वेळी, कसबा पेठ, पर्वती या मतदारसंघात भाजपचे जास्त नगरसेवक होते. त्यामुळे, त्या जागा मिळाल्या, तरी वाढणाऱ्या जागांची संख्या मर्यादीत राहील. त्या तुलनेत शिवाजीनगर व कोथरूड मतदारसंघातील भाजपच्या जागांमध्ये वाढ होईल, अशी चिन्हे आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावक्षेत्र पहिल्यापासूनच शहरालगतच्या उपनगरांत आहे. हडपसर (सात प्रभाग), वडगावशेरी (सहा प्रभाग) आणि खडकवासला (पाच प्रभाग) या तीन मतदारसंघातून 71 नगरसेवक महापालिकेत येणार आहेत. या तीन मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक मोठ्या संख्येने असल्याने, तसेच चार नगरसेवकांचा प्रभाग झाल्याने या भागातील राष्ट्रवादीची स्थिती खूप भक्कम राहील. 

हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ शिवसेना दुसरे स्थानावर राहण्याची शक्‍यता आहे. वडगावशेरी मतदारसंघात गेल्या वेळेपेक्षा भाजपची स्थिती सुधारणार असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात निम्म्यापेक्षा जास्त जागा असतील. खडकवासला मतदारसंघातही चारचा प्रभाग झाल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर राहील, अशी चिन्हे आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात तीन प्रभाग असून, तेथे मुख्यत्वे भाजप व काँग्रेस यांच्यात लढत रंगणार आहे. 

चार मते एकाच पक्षाला देणार, की वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांना निवडणार, यांवर प्रत्येक प्रभागातील चुरस रंगणार आहे. मनसेच्या जागा कमी होणाऱ्या जागा भाजपच्या पारड्यात पडतील. मात्र, 26 जागांवरून 82 जागांचा पल्ला गाठण्यासाठी त्यांना सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या भागात मोठे खिंडार पाडावे लागेल. राष्ट्रवादीने काँग्रेसशी आघाडी करीत आपला गड राखण्यावर भर दिल्याने, त्यांचे स्थान टिकून राहील, अशी सध्याची स्थिती आहे.

पुण्यातील महापालिका निवडणुकीतील विधानसभा मतदारसंघनिहाय शक्यता अशाः
- पुणे महापालिका क्षेत्रात एकूण विधानसभा मतदारसंघ आहेत आठ
- कसबा पेठ, कोथरूड, शिवाजीनगर, पर्वतीत भाजप आघाडीवर
- खडकवासला, वडगाव शेरी, हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर
- पुणे कॅन्टोनमेंटमध्ये काँग्रेस अन्य पक्षांच्या पुढे राहण्याची चिन्हे

विधानसभा मतदारसंघनिहाय नगरसेवकांची संख्याः

विधानसभा मतदारसंघ प्रभागांची संख्या नगरसेवक
कसबा पेठ 5 20
कोथरूड 6 24
शिवाजीनगर 3 12
पर्वती 6 23
खडकवासला     5 20
वडगाव शेरी 6 24
हडपसर 7 27
कॅन्टोनमेंट 3 12

 

Web Title: Dnyaneshwar Bijale writes about Pune Municipal Corporation Election