शहरात होतेय ज्ञानेश्‍वरी पारायण अन्‌ कुरआन पठण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

पिंपरी - हिंदूंचा अधिकमास आणि मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सध्या सुरू आहे. त्यामुळे मंदिरांमध्ये ज्ञानेश्‍वरी पारायण आणि मशिदींमध्ये कुरआन पठण होत आहे. 

पिंपरी - हिंदूंचा अधिकमास आणि मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सध्या सुरू आहे. त्यामुळे मंदिरांमध्ये ज्ञानेश्‍वरी पारायण आणि मशिदींमध्ये कुरआन पठण होत आहे. 

हिंदू धर्मामध्ये अधिकमासाला महत्त्व आहे. त्यालाच पुरुषोत्तममास, दामोदरमास, फलमास किंवा धोंड्याचा महिना असेही म्हणतात. या कालावधीत ज्ञानेश्‍वरी पारायण केले जाते. तर, मुस्लिम बांधवांचा रमझान महिना कधी २९, तर कधी ३० दिवसांचा येतो. या महिन्यात उपवास अर्थात रोजा व कुरआन पठणाला विशेष महत्त्व आहे. ज्येष्ठ वास्तुतज्ज्ञ व ज्योतिष आनंद पिंपळकर म्हणाले, ‘‘चंद्रमास व सूर्यमास अशा दोन कालगणना हिंदू धर्मात आहेत. त्यावरून पंचांग ठरते. चंद्रमास २९.५ दिवसांचा मानला जातो. त्यामुळे दर तीन वर्षांनी ३३ दिवसांचा फरक पडतो.

त्यामुळे अधिकमासाची गणना केली जाते. याचे महत्त्व देवी भागवत या ग्रंथातही सांगितले आहे. अधिक महिन्यात अनेक जण एक वेळ जेवण करून उपवास करतात. दिवसभरात काहीही खात नाहीत. या काळात निसर्ग व मानवी शरीर यांच्यात खाद्यपदार्थांच्या माध्यमातून समतोल साधला जावा, हा यामागील हेतू असवा. या महिन्यात दान व नदी स्नानाला अधिक महत्त्व आहे.’’

रमजानबाबत नेहरूनगर येथील जामा मशिदीचे इमामसाब सय्यद अबुल कलाम अशरफी म्हणाले, ‘‘रमजान महिन्यातील उपवास काळात सूर्योदयापूर्वी खायचे असते. त्याला ‘सहेरी’ आणि सूर्यास्तानंतर उपवास सोडायचा त्याला ‘इफ्तार’ म्हणतात. या दोन्ही वेळांच्या दरम्यान काहीही खायचे अथवा प्यायचे नसते. त्यालाच ‘रोजा’ म्हटले जाते. रमजानमध्ये रोजा, कुरआन पठण, नमाज व दानाला अधिक महत्त्व आहे. मात्र, आधी स्वतःच्या कुटुंबीयांचा विचार करा, ते सुखी झाल्यावर शेजाऱ्यांचा आणि त्यानंतर नातेवाईक व इतरांचा विचार करायचा, अशी अल्लाहाची शिकवण आहे.’’

तारखा सांगतात...
अधिकमास
 प्रारंभ : बुधवार, १६ मे
 समाप्त : बुधवार, १३ जून
रमजान महिना
 प्रारंभ : गुरुवार, १७ मे, काहींच्या मते चंद्र दर्शनामुळे १८ मे : शुक्रवार
 समाप्त : शुक्रवार, १५ जून, चंद्र दर्शन न झाल्यास १६ जून. 

Web Title: dnyaneshwari parayan quran reading