रुग्णालयाची सुरक्षा अधिक बळकट करा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

पिंपरी - डॉक्‍टरांवर वारंवार होणारे हल्ले रोखण्यासाठी रुग्णालयाची सुरक्षा अधिक बळकट करा, अशी मागणी वायसीएम रुग्णालयातील निवासी डॉक्‍टरांनी केली. आपल्या विविध मागण्यांसाठी ४२ डॉक्‍टरांनी गुरुवारपासून सामूहिक  रजेचे संपाचे हत्यार उपसले असल्याने रुग्णालयातील सेवा कोलमडून पडली आहे. 

पिंपरी - डॉक्‍टरांवर वारंवार होणारे हल्ले रोखण्यासाठी रुग्णालयाची सुरक्षा अधिक बळकट करा, अशी मागणी वायसीएम रुग्णालयातील निवासी डॉक्‍टरांनी केली. आपल्या विविध मागण्यांसाठी ४२ डॉक्‍टरांनी गुरुवारपासून सामूहिक  रजेचे संपाचे हत्यार उपसले असल्याने रुग्णालयातील सेवा कोलमडून पडली आहे. 

धुळे आणि त्यानंतर मुंबई येथील डॉक्‍टरांवर हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी, तसेच डॉक्‍टरांना योग्य ती सुरक्षा पुरवावी या मागणीसाठी मुंबईसह महाराष्ट्रातील शासकीय व खासगी डॉक्‍टरांनी बंद पुकारला आहे. यामुळे महाराष्ट्रातील रुग्णांचे हाल होत आहेत. डॉक्‍टरांच्या मागणीला समर्थन देण्यासाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात काम करणारे ४२ डॉक्‍टर सामूहिक रजेवर गेले आहेत. तर महापालिकेचे डॉक्‍टरही काळ्या फिती लावून काम करीत आहेत. 

निवासी डॉक्‍टरांनी वायसीएम रुग्णालयाबाहेर आणि महापालिका भवनाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली. तसेच, आयुक्‍तांना निवेदनही दिले. या वेळी बोलताना डॉक्‍टरांनी आपली व्यथा मांडली. तातडीक कक्षात काम करताना रुग्णाचे नातेवाईक हातात फोन घेऊन येतात. मात्र, रुग्णाला तपासले नसतानाही समोरील मान्यवर व्यक्‍तीशी कसे बोलणार? राजकीय दबावामुळे काम करणे अवघड जाते. समोर गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णावर उपचार करण्याचे सोडून राजकीय नेत्याच्या रुग्णाला तपासावे लागते. यामुळे इतर रुग्णांच्या नातेवाइकांच्या रोषाला डॉक्‍टरांना बळी पडावे लागते. याशिवाय रुग्णासोबत आठ ते दहा नातेवाईक असतात. डॉक्‍टर काय प्रयत्न करतात ते नातेवाईक पाहात असतात. मात्र, उशिराने येणाऱ्या नातेवाइकाला हे माहिती नसते. त्यातूनही एखादा रुग्ण दगावला, की नातेवाईक डॉक्‍टरांनाच दोषी धरून त्यांच्यावर हल्ले होतात. 

या वेळी आपल्या मागण्या माडतांना उपस्थित डॉक्‍टरांनी आम्हाला मानधनही कमी मिळते, रुग्णालयात स्टाफ कमी आहे, डॉक्‍टरांना उद्धटपणे बोलणे, धक्काबुक्कीसारखे प्रकार घडतात. सुरक्षाव्यवस्था वाढवा, मानधनामध्ये वाढ करा, कर्मचारी संख्याही वाढवा, अशी मागणी केली आहे. याशिवाय काम करीत असताना वरिष्ठांकडून कायम कारवाईची धमकी दिली जाते, यामुळे डॉक्‍टरांवरही मानसिक दबाव निर्माण होतो.

वायसीएमची रुग्णसेवा कोलमडली
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात डॉक्‍टरांची संख्या अगोदरच कमी आहे. त्यातूनही ४२ निवासी डॉक्‍टर संपावर गेले आहेत. महापालिकेचे डॉक्‍टर कामावर असून त्यांच्यासमोर उपचार करून घेण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागल्याचे चित्र बाह्य रुग्ण विभागात गुरुवारी पाहायला मिळाले. डॉक्‍टरांच्या संपामुळे महापालिकेची रुग्णसेवा कोलमडून पडली आहे.

Web Title: do the hospital security powerfull