खासगी कंपन्यांचे पुरस्कार स्वीकारू नका 

गुरुवार, 5 एप्रिल 2018

पुणे - सहकारी संस्थांनी खासगी कंपन्यांमार्फत दिले जाणारे पुरस्कार स्वीकारू नयेत. तसेच खासगी संस्थांकडून प्रशिक्षण घेऊ नये, अशा सूचना सहकार आयुक्‍तालयाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. काही सहकारी संस्थांचे संचालक खासगी कंपन्यांकडून पुरस्कार स्वीकारत असून, त्यावर सभासद-ठेवीदारांच्या पैशांची उधळपट्टी होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

पुणे - सहकारी संस्थांनी खासगी कंपन्यांमार्फत दिले जाणारे पुरस्कार स्वीकारू नयेत. तसेच खासगी संस्थांकडून प्रशिक्षण घेऊ नये, अशा सूचना सहकार आयुक्‍तालयाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. काही सहकारी संस्थांचे संचालक खासगी कंपन्यांकडून पुरस्कार स्वीकारत असून, त्यावर सभासद-ठेवीदारांच्या पैशांची उधळपट्टी होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

याबाबतचे परिपत्रक बुधवारी (ता. 4) सहकार आयुक्‍तालयाने जारी केले. सहकारी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सहकारी संस्थांना राज्य सरकारकडून पुरस्कार देण्यात येतो; परंतु काही सहकारी संस्था खासगी कंपन्यांमार्फत पुरस्कार स्वीकारत आहेत. ज्या सहकारी संस्थांविरुद्ध तक्रारी प्राप्त आहेत, अशा सहकारी संस्थांना खासगी कंपन्यांकडून पुरस्कार प्राप्त झाल्यास त्या संस्थांबाबत सभासद आणि ठेवीदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्‍यता असते. खासगी पुरस्कारांच्या निकषाबाबत सरकारचे नियंत्रण नसते. शिवाय, या पुरस्कार सोहळ्यावर अवाजवी खर्च होत आहे. सध्याची सहकार चळवळीची परिस्थिती पाहता सहकारी संस्थांनी खासगी पुरस्कार स्वीकारू नयेत. तसेच खासगी संस्थांकडून प्रशिक्षण घेऊ नये, अशा सूचना या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत. 

नियमाचे उल्लंघन झाल्यास कारवाई 
नियमाचे पालन न करणाऱ्या सहकारी संस्थांवर संबंधित विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, तालुका उपनिबंधक किंवा सहायक निबंधकांनी कायदेशीर कार्यवाही करावी. तसेच लेखापरीक्षकांनी अहवालात त्या सहकारी संस्थेने खासगी संस्थांकडून पुरस्कार न स्वीकारल्याचे प्रकर्षाने नमूद करावे, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

खासगी प्रशिक्षण गैर 
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 24 (अ) अन्वये राज्य सरकारने सहकारी संस्थांचे सभासद, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिक्षण व प्रशिक्षण देण्यासाठी राज्य सहकारी संघ तसेच राज्य शिखर प्रशिक्षण संस्था यांना प्राधिकृत केले आहे. सहकारी संस्थांनी खासगी प्रशिक्षण संस्थांकडून प्रशिक्षण घेणे गैर आहे. 

सहकार खात्याच्या या निर्णयाचे सहकारी बॅंकिंग क्षेत्राकडून स्वागत करण्यात आले आहे. खासगी कंपन्या पुरस्कार वितरणाच्या निमित्ताने बॅंकांचे सेमिनार भरवून आयटी कंपन्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे ठेवीदार आणि ग्राहकांची दिशाभूल होत आहे. काही संचालक परराज्यांत जाऊन संस्थेचे पैसे खर्च करतात; परंतु या निर्णयामुळे गैरप्रकारांना आळा बसेल. 
- विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, महाराष्ट्र फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक्‍स 

Web Title: Do not accept private companies award