पैशांअभावी उपचारास टाळाटाळ नको - जिल्हाधिकारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

पुणे - जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून उपचाराच्या रकमेपोटी धनादेश स्वीकारावेत, तसेच पैशांअभावी कोणत्याही रुग्णावर उपचार करण्यास टाळाटाळ करू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिल्या. तसेच रुग्ण अथवा नातेवाइकांची याबाबत काही तक्रार असल्यास तत्काळ 108 या हेल्पलाइनवर अथवा आरोग्य संनियंत्रण समितीशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.

खासगी रुग्णालयाकडून जुन्या 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास नकार देण्यात येत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनास प्राप्त होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या आरोग्य संचालनालयाने सर्व खासगी रुग्णालयांना रुग्णांकडून धनादेश स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य विभागाला संनियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली आहे. रुग्णांना खासगी रुग्णालयाकडून सहकार्य मिळत नसल्यास त्यांनी 108 या हेल्पलाइनवर अथवा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या 020-27286458 तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे यांच्याशी 020-26051418, 26129965 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. तसेच या निर्णयाची माहिती देणारा फलक प्रत्येक रुग्णालयाने दर्शनी भागात लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

औषधोपचाराबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यास आरोग्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याने संबंधित रुग्णालयाशी संपर्क साधून रुग्णाचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक प्राप्त करून घ्यावेत व रुग्णालयात कोणत्याही परिस्थितीत शुल्काअभावी आपत्कालीन औषधोपचार टळणार नाहीत याची काळजी घ्यावी. रुग्णांनी अथवा त्यांच्या नातेवाइकांनी संबंधित रुग्णालयातील जबाबदार व्यक्तीचा दूरध्वनी अथवा मोबाईल नंबर घ्यावा, जेणेकरून त्यांना धनादेश स्वीकारण्यास मदत होईल. तसेच एखाद्या रुग्णाने उपचार घेतलेल्या रुग्णालयास दिलेला 10 हजार रुपयांपर्यंतचा धनादेश न वटल्यास या धनादेशाची प्रतिपूर्ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात येणार असल्याचेही जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

Web Title: do not avoid treatment for money