संघाला असे दिवस येतील यावर विश्वास नव्हता: सरसंघचालक भागवत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

"आणीबाणीच्या काळात मी एका नगराचा प्रचारक होतो; परंतु शाखा बंद असल्यामुळे आम्हाला काहीच करता येत नव्हते. आणीबाणीनंतरच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्याबद्दल आम्ही आमच्या वरिष्ठ सहकाऱ्यांना विचारले, ते म्हणाले, की विरोधी पक्ष एकत्र आले, तर त्यांना 276 जागा मिळतील, त्या वेळी आम्ही हसलो. कारण आम्हाला "सॉलिड, सॉलिड आणि डिपॉझिट जप्त' अशी सवय होती. परंतु संघाला असे दिवस येतील, असे कोणी सांगितले असते, तरी आमचा विश्‍वास बसला नसता,'' असेही सांगत भागवत यांनी समाधान व्यक्त केले. 

पुणे : "वैमानिक विमान चालवत असतो, तेव्हा तो एकटा ते विमान उड्डाण करू शकत नाही. तर, त्याला उड्डाण करताना सूचना देणारे नियंत्रक, विमानातील प्रवाशांना वेळोवेळी सूचना देणारे कर्मचारी याचाही त्यात सहभाग तितकाच मोलाचा असतो. म्हणूनच आपण, मी करतो, मी केले, मी केले, मी किती चांगला, असा अहंकार बाळगण्यात काय अर्थ आहे,'' असा संदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला. 

गीताधर्म मंडळातर्फे गीता दर्शन मासिक सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रम भागवत यांच्या उपस्थितीत झाला. मंडळाच्या स्मरणिकेचे प्रकाशनही या वेळी करण्यात आले. कार्यक्रमात गीताधर्म मंडळासाठी समर्पण भावनेने काम केलेल्या वसुधा पाळंदे यांना "सरस्वती आपटे पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष मुकुंद दातार, कार्यवाह विनया मेहेंदळे, मोरेश्‍वर जोशी, मुकुंद कोंढवेकर उपस्थित होते. 

"आणीबाणीच्या काळात मी एका नगराचा प्रचारक होतो; परंतु शाखा बंद असल्यामुळे आम्हाला काहीच करता येत नव्हते. आणीबाणीनंतरच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्याबद्दल आम्ही आमच्या वरिष्ठ सहकाऱ्यांना विचारले, ते म्हणाले, की विरोधी पक्ष एकत्र आले, तर त्यांना 276 जागा मिळतील, त्या वेळी आम्ही हसलो. कारण आम्हाला "सॉलिड, सॉलिड आणि डिपॉझिट जप्त' अशी सवय होती. परंतु संघाला असे दिवस येतील, असे कोणी सांगितले असते, तरी आमचा विश्‍वास बसला नसता,'' असेही सांगत भागवत यांनी समाधान व्यक्त केले. 

"गीताधर्म हा राष्ट्रधर्म आहे, हे मनाला समजते. पण, प्रमाणासहित लोकांसमोर मांडायचे, तर अध्ययन आणि अधिकार लागतो. परंतु, कर्तव्य उपस्थित झाल्यावर त्यांच्याकडे पाठ फिरवायची नाही, असा गीतेचा पहिला पाठ आहे. संतुलित आचरण म्हणजे धर्म. व्यक्‍तीने आचरण कसे करावे, याचे विवेचन गीतेमध्ये आहे,'' असे सांगत भागवत यांनी "गीता धर्म' विषयावर विवेचन केले. आपण प्रयत्न निर्दोष आणि चिकाटीने केले असतील, तर ध्येय हे साध्य होतेच. कर्तव्य करताना मला काय मिळेल, असा विचार आला की ते कर्म बिघडते. फळाची अपेक्षा ठेवायची नसते, तसेच ते मोजायचेही नसते, केवळ कर्तव्य करत राहायचे, असा सल्लाही भागवत यांनी दिला. 

सर्वसामान्यांपर्यंत गीता पोचायला हवी, असेही त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दातार यांनी केले. 

Web Title: Do not be ego says mohan bhagwat in pune