पोलिसांची भीती नव्हे, भरोसा वाटावा

पोलिसांची भीती नव्हे, भरोसा वाटावा

पुणे - केवळ गुन्हेगार पकडणे हे पोलिसांचे काम नाही, तर त्यांच्या कामाला सामाजिक आयाम असणे आवश्‍यक आहे. पोलिस सत्ता गाजविण्यासाठी नाहीत, तर समाजाला सेवा देण्यासाठी आहेत. त्यामुळे पोलिसांकडे जाण्याची नागरिकांना भीती न वाटता, त्यांना भरोसा वाटावा, असे काम पोलिसांनी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केले. 

शहर पोलिसांतर्फे आयुक्तालयाच्या आवारात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या समस्यांची सोडवणूक एकाच ठिकाणी व्हावी, यासाठी उभारण्यात आलेल्या ‘भरोसा’ कक्षाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या निमित्ताने ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, सहआयुक्त शिवाजी बोडखे आदी उपस्थित होते. 

फडणवीस म्हणाले,  ‘‘सध्या शहरीकरणामुळे नागरिकांच्या जीवनाचे अनेक संदर्भ बदलत आहेत. अनेक नव्या समस्यांना लोकांना तोंड द्यावे लागत आहे.  या नव्या समस्यांना सामोरे जाताना समुपदेशनाची मदत घेण्याची आवश्‍यकता आहे. कौटुंबिक कलह हीसुद्धा मोठी समस्या निर्माण झाली आहे. या नव्या समस्यांना सामोरे जाताना पोलिसांनी केवळ तांत्रिक बाबीत न जाता समुपदेशनाचा मार्ग स्वीकारावा. समुपदेशनाच्या माध्यमातून नवा सुदृढ समाज घडविण्यासाठी प्रयत्न करावा.’’ शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे अद्ययावत करून घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. 

या वेळी विशेष कामगिरी करणारे पोलीस निरीक्षक गजानन पवार, ॲपवरील बोधचिन्ह तयार करणाऱ्या तनया फुलारी, इंटेरीअर डिझाइनर व डेकोरेटेर महेश सप्रे यांचा फडणवीस यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

तक्रारदाराचे कार्ड मुख्यमंत्र्यांनी भरले 
भरोसा सेलच्या उद्‌घाटनानंतर फडणवीस यांनी सेलची पाहणी करून या कक्षाच्या कामाची माहिती घेतली. या वेळी फडणवीस यांनी या कक्षात आलेल्या तक्रारदाराचे कार्ड स्वत: भरून दिले. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भरोसा पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com