भिकाऱ्यांसाठी 16 लाखांच्या नोकरीवर पाणी - डॉ. सोनवणे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

सोमेश्वरनगर - 'अनवाणी चाललो, तरच पावले उमटतात...उन्हात उभं राहिलं तरच सावली पडते, हे मला भिकारी दांपत्यानं पडत्या काळात शिकविलं. त्यानंतर मी बारा वर्ष संघर्ष करून अर्धे जग फिरून पैसा मिळवला; परंतु त्या दांपत्याच्या विचारांची ठिणगी पुन्हा मेंदूत शिरली आणि सोळा लाख प्रतिमहिना पगाराची नोकरी नाकारून मी पुन्हा भिकाऱ्यांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरलो.'' भिकाऱ्यांचे डॉक्‍टर ही उपाधी अभिमानाने मिरविणारे डॉ. अभिजित सोनवणे सांगत होते.

करंजेपूल (ता. बारामती) येथील सोमेश्वर पॉलिटेक्‍निक कॉलेजच्या प्रांगणात भारत ज्ञान विज्ञान समुदाय संघटनेच्या वतीने आयोजित "ज्ञान विज्ञान गप्पा' कार्यक्रमात डॉ. सोनवणे बोलत होते. अध्यक्षस्थानी काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमप्रसाद केंजळे होते. याप्रसंगी सरपंच राजकुमार बनसोडे, प्रा. कुंडलिक कदम, हेमंत जगताप, शशिकांत जेधे, बाळासाहेब मोटे, नम्रता कामतकर, शशिकांत अनपट, लता रिठे, कल्याणी शिंदे, प्रा. डॉ. रेश्‍मा पठाण उपस्थित होते.

सोनवणे म्हणाले, 'घरच्या मदतीशिवाय उभे राहून दाखवायचे ही जिद्द होती. त्यामुळे डॉक्‍टरकी शिकूनही पराकोटीचा संघर्ष करावा लागला. या प्रवासात घरातून बाहेर काढल्याने भिकारी बनलेले एक दांपत्य भेटले. त्यांच्याकडून खूप शिकलो. प्रतिमहा सोळा लाख रुपये पगाराची नोकरी सोडून मी भिकाऱ्यांच्या मदतीचे काम सुरू केले. सुमारे 761 भिकाऱ्यांची नोंदणी केली असून रोज त्यांच्यावर उपचार करतो. त्यांच्याशी नाती जोडली आहेत. 42 आजी आजोबांनी भीक सोडून काम सुरू केले आहे.''
प्रा. डॉ. राहुल खरात यांनी प्रास्ताविक केले. आकाश सावळकर यांनी आभार मानले.

'भीक देऊ नका'
'भिकारी परिस्थितीतून, दारिद्य्रातून तयार होतात. तसेच मुलं, सुना, नातवंडे यांच्याकडून हाकलले गेल्यावरही निर्माण होतात. माणसांपासून पुन्हा माकडं तयार व्हायला लागली आहेत, असे कधी कधी वाटते. भिकाऱ्यांना काम द्या, उभं करा. भीक मिळायची सवय लागली की कामाची इच्छा संपून जाते. एकवेळ मदत नाही केली तरी चालेल; पण भीकतरी देऊ नका. मी भिकाऱ्यांना उभे करत पेल्याने हौद भरतोय आणि तुम्ही भीक देऊन हौदाचा नळच मोकळा करताय,'' अशी भावना सोनवणे यांनी व्यक्त केली.

Web Title: Doctor left his high paid salary job for social work