डॉक्‍टर आज काळ्या फिती लावून सेवा करणार

डॉक्‍टर आज काळ्या फिती लावून सेवा करणार

पुणे - ग्राहक संरक्षण विधेयकाच्या निषेधार्थ देशभरातील डॉक्‍टर उद्या (ता. ४) काळ्या फिती लावून वैद्यकीय सेवा करणार आहेत. पुण्यातही प्रमुख रुग्णालयांसमोर या कायद्याच्या विरोधातील फलक लावण्यात येणार आहे. 

केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्राहक संरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर केले आहे, ते विधेयक आता मंजुरीसाठी राज्यसभेत पाठविले आहे. हे विधेयक मंजूर होऊ नये, यासाठी राज्यसभेचे या विधेयकाकडे लक्ष वेधण्यासाठी देशातील सर्व डॉक्‍टर शुक्रवारी दिवसभर काळ्या फिती लावून वैद्यकीय सेवा करतील, असा निर्णय ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) घेतला आहे. राष्ट्रीय वैद्यक परिषद आणि इंडियन वैद्यक आयोग हे कायदेदेखील डॉक्‍टरांसाठी अन्यायी आहेत, त्यामुळे त्याला विरोध करण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यात पुण्यासह राज्यातील सर्व डॉक्‍टर सहभागी होणार आहेत, अशी माहिती ‘आयएमए’च्या राज्य शाखेचे नियोजित अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली. पुण्यातील प्रमुख रुग्णालयांमध्ये या कायद्याच्या निषेधार्थ मोठे फलक लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

रुग्णालयात आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी दाखल रुग्णाचे उपचारादरम्यान काही नुकसान झाल्यास त्याविरोधात भरपाई किंवा दंडाची रक्कम वाढविण्याचे या विधेयकात प्रस्तावित केले आहे. जिल्हास्तरावर १० लाख ते एक कोटी आणि राज्यस्तरावर एक कोटी ते १० कोटीपर्यंतची दंडाची तरतूद केली आहे. विधेयकातील या तरतुदींना ‘आयएमए’च्या राष्ट्रीय शाखेने विरोध केला आहे. या विधेयकातील अन्यायकारक तरतुदींची माहिती राज्यसभेतील खासदारांना भेटून देण्यात येणार आहे. 

ग्राहक संरक्षण कायदा १९८६ मध्ये अस्तित्वात आला, त्यानंतर १९९४ मध्ये पुन्हा तो नव्याने आला. आता त्यात सुधारणा करण्यात येत आहे. दंडात्मक किंवा नुकसान भरपाईची मर्यादा वाढविल्यास डॉक्‍टरांना ‘इन्डेम्निटी इन्शुरन्स’चा हप्तादेखील वाढण्याची भीती आहे, त्यातून रुग्णाच्या उपचाराचा खर्च वाढण्याचा धोका आहे, असेही रुग्णालयांतर्फे सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com