महापालिकेकडेही होणार दस्तनोंदणी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

मिळकतीची मालकी हस्तांतरण नोंदणी दस्त विभागाकडे होताच त्याची नोंद महापालिकेकडेही राहणार आहे. त्यासाठी दोन्ही यंत्रणांकडील संगणकप्रणाली (सॉफ्टवेअर) एकमेकांशी जोडली जाणार असून, त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीने गुरुवारी मंजूर केला.

पुणे - मिळकतीची मालकी हस्तांतरण नोंदणी दस्त विभागाकडे होताच त्याची नोंद महापालिकेकडेही राहणार आहे. त्यासाठी दोन्ही यंत्रणांकडील संगणकप्रणाली (सॉफ्टवेअर) एकमेकांशी जोडली जाणार असून, त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीने गुरुवारी मंजूर केला. त्यामुळे मिळकतींच्या नोंदीमुळे महापालिकेच्या मिळकतकराच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. 

शहरातील मिळकतींचे खरेदीखत हस्तांतरण मुद्रांक विभागाकडे नोंदणी केल्यानंतर कायदेशीर होते. त्यासाठी मुद्रांक विभागाच्या दस्तनोंदणी कार्यालयात "आय-सरिता' या संगणकप्रणालीचा वापर करण्यात येतो. मात्र, महापालिकेच्या हद्दीतील मिळकतींच्या नोंदणीसाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. त्यानुसार कर आकारणी करण्यात येते. मात्र, काही मिळकतींची नोंद नसल्याने महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. त्यावर उपाय म्हणून मिळकतींचा शोध घेण्याची स्वतंत्र मोहीम महापालिकेच्या वतीने घेण्यात येते.

या पार्श्‍वभूमीवर महापालिका आणि मुद्रांक विभागाची यंत्रणा एकमेकांशी जोडण्याबाबत या विभागाने पुढाकार घेतला होता. त्यानुसार महापालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागाने स्थायी समितीपुढे प्रस्ताव मांडला होता. तो मंजूर केल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Document Registration in PMC