भटक्‍या कुत्र्यांना हिरवा पट्टा

दिलीप कुऱ्हाडे 
शनिवार, 15 डिसेंबर 2018

पुणे - शहरातील भटक्‍या कुत्र्यांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहील असे अँटिरेबीजचे इंजेक्‍शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे म्हणून त्यांच्या  गळ्यात हिरवा पट्टा बांधण्यात येणार आहे. नवीन वर्षापासून शहरातील लसीकरण आणि शस्त्रक्रिया केलेल्या कुत्र्यांचे छायाचित्र काढून त्याची ऑनलाइन नोंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या डॉग स्क्‍वॉडचे प्रमुख डॉ. प्रकाश वाघ यांनी दिली.

शहरात कुत्र्यांना अँटिरेबीजचे इंजेक्‍शन देऊन त्यांची शस्त्रक्रिया केली जाते. पाच वर्षांत सुमारे पन्नास हजार कुत्र्यांची शस्त्रक्रिया व लसीकरण करण्यात आले. शहरातील वाढणाऱ्या भटक्‍या कुत्र्यांची संख्या पाहता किती कुत्र्यांना अँटिरेबीजचे इंजेक्‍शन दिले व किती कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली हे शोधणे अवघड आहे. म्हणून आता शहरात, एकाच मध्यवर्ती ठिकाणी भटक्‍या कुत्र्यांना पकडून इंजेक्‍शन देणे, तसेच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, त्यासाठी संस्थेची नेमणूक केली आहे.

डॉ. वाघ म्हणाले, ‘‘संबंधित संस्था तीन वर्षे भटक्‍या कुत्र्यांचे लसीकरण व त्यांच्यावरील शस्त्रक्रिया करून त्यांच्या गळ्यात हिरव्या रंगाचा पट्टा बांधणार आहे. नवीन इंजेक्‍शनची प्रतिकारशक्ती तीन वर्षांपर्यंत राहणार आहे. त्यानंतर कुत्र्यांचे पुन्हा लसीकरण करण्यात येणार असून, त्यांच्या गळ्यात नंतर लाल रंगाचा पट्टा बांधण्यात येईल. एका कुत्र्याची संपूर्ण माहिती संकलित करण्यासाठी महापालिका संबंधित संस्थेला ८४० रुपये देणार आहे.

शहरातील कुत्र्यांना पकडणे, त्यांना अँटिरेबीज इंजेक्‍शन देणे, त्यांच्या गळ्यात पट्टा बांधणे, त्याचे छायाचित्र काढून ते ऑनलाइन अपलोड करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील भटक्‍या कुत्र्यांवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनेत पारदर्शकता येणार आहे.
- डॉ. प्रकाश वाघ, प्रमुख, डॉग स्कॉड, आरोग्य विभाग

फक्त १९१५ कुत्र्यांची अधिकृत नोंद
शहरातील फक्त १९१५ कुत्र्यांना अधिकृत परवाना आहे. त्या कुत्र्यांचे नियमित लसीकरण करण्यात येते. अशा कुत्र्यांच्या गळ्यात नोंदणी क्रमांकासह पट्टा असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

Web Title: Dog Green Belt rabies vaccine