भटक्‍या कुत्र्यांच्या प्रश्‍नांवर प्रशासन निरुत्तर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

पुणे - शस्त्रक्रिया केलेल्या कुत्र्यांच्या कानाला कापले जाते ना; मग शस्त्रक्रिया केलेल्या कुत्रीला पिल्ले झाली कशी ?... दिल्लीवरून फोन आल्यानंतर भटक्‍या कुत्र्यांवरील कारवाई थांबविली का जाते, असे प्रश्‍न उपस्थित करीत नगरसेविकांनी महापालिका प्रशासनाला निरुत्तर केले.

पुणे - शस्त्रक्रिया केलेल्या कुत्र्यांच्या कानाला कापले जाते ना; मग शस्त्रक्रिया केलेल्या कुत्रीला पिल्ले झाली कशी ?... दिल्लीवरून फोन आल्यानंतर भटक्‍या कुत्र्यांवरील कारवाई थांबविली का जाते, असे प्रश्‍न उपस्थित करीत नगरसेविकांनी महापालिका प्रशासनाला निरुत्तर केले.

अखेर भटक्‍या कुत्र्यांचा त्रास थांबविण्यासाठी योग्य ती उपाययोजना करा, असा आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी आरोग्य विभागाला दिला.

कमला नेहरू उद्यान येथे मंगला गोडबोले यांच्यावर तीन कुत्र्यांनी हल्ला केल्यानंतर भटक्‍या कुत्र्यांच्या होणाऱ्या उपद्रवाचा विषय पुढे आला. भटक्‍या कुत्र्यांमुळे होणाऱ्या त्रासाविषयी नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. याचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. रेबीज प्रतिबंधक लशीची उपलब्धता, प्राणी मित्रांकडून होणारा हस्तक्षेप, चायनीज खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करा, इतर ठिकाणी भटक्‍या कुत्र्यांसंदर्भात काय उपाययोजना केली जाते, याचा अभ्यास करून त्याची अंमलबजावणी करा, असे विविध मुद्दे नगरसेवकांनी मांडले.

त्यावर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी उत्तर देताना चार संस्थांच्या मदतीने कुत्री पकडणे, त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया आणि लसीकरण करणे आणि त्यांना परत सोडण्याचे काम केले जाते. सध्या दररोज 70 शस्त्रक्रिया केल्या जात असून, यावर्षी दररोज 125 शस्त्रक्रिया करण्याचे लक्ष ठेवण्यात आल्याचे सांगितले. नसबंदी आणि लसीकरण केलेली कुत्री कशी ओळखली जातात, आत्तापर्यंत या कामासाठी किती रुपये खर्च झाले, असे विविध प्रश्‍न नगरसेवकांनी उपस्थित केले. या प्रश्‍नांवर प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे अखेर महापौरांनी प्रशासनाला कुत्र्यांचा योग्य तो बंदोबस्त करण्याचे आदेश दिले.

नगरसेवकांचे बोल
- शस्त्रक्रिया झालेल्या कुत्रीला पिल्ले होतात कशी ? पिल्ले आणि कुत्री तुम्हाला दाखवू का ? तिच्याही कानाला शस्त्रक्रिया झाल्याची खूण केली गेली आहे.
- कालिंदी पुंडे

- प्राणीमित्रांनी माणसांचीदेखील काळजी घेतली पाहिजे. कुत्र्यांचा उपद्रव वाढत असून, ही धोक्‍याची घंटा आहे. कुत्र्यांना पकडण्यास गेल्यानंतर दिल्लीतून कोणाचा फोन येतो आणि कारवाई थांबते.
- ज्योत्स्ना एकबोटे

- मंत्रालयात उंदीर मारण्यासाठी झालेला खर्च आणि पुण्यात कुत्र्यांवर शस्त्रक्रिया, लसीकरणासाठी होणारा खर्च हा एकच प्रकार दिसतोय. पाणीपुरवठ्याच्या तक्रारीपाठोपाठ आता भटक्‍या कुत्र्यांच्या तक्रारी आम्हाला येत आहेत.
- बाबूराव चांदेरे

- गेल्या आठ वर्षांत चार कोटी रुपये खर्च महापालिकेने शस्त्रक्रियेसाठी केले, तरीही कुत्र्यांची संख्या वाढते कशी? आतापर्यंत केलेल्या खर्चाचे निष्कर्ष दिसत नाहीत.
- अरविंद शिंदे

-हा प्रश्‍न गंभीर झाला असून, त्यावर ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करायला हवी.
- माधुरी सहस्रबुद्धे

कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरणावर झालेला वर्षनिहाय खर्च (लाखांत)
2010-11 : 25
2011 -12 : 35
2012-13 : 40
2013 -14 : 70
2014-15 : 43
2015-16 : 54
2016-17 : 60
2017 -18 : 72
2018-19 ( अंदाज पत्रकात तरतूद) : 2 कोटी रुपये

Web Title: Dog issue administrative nonplussed