पाण्याच्या आवर्तनामुळे वीजपुरवठा खंडीत करू नये

जनार्दन दांडगे
शनिवार, 7 एप्रिल 2018

उरुळी कांचन (पुणे) : नवीन मुळा-मुठा कालव्यातून २४ मार्चपासून शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. मात्र आवर्तन काळात कालव्याच्या परिसरातील रोहीत्रांचा वीजपुरवठा खंडित केल्याने त्याचा फटका पिकांना बसत आहे. त्यामुळे आवर्तन कालावधीत कालव्याच्या परिसरातील रोहीत्रांचा वीजपुरवठा खंडित करू नये अशी मागणी पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.

उरुळी कांचन (पुणे) : नवीन मुळा-मुठा कालव्यातून २४ मार्चपासून शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. मात्र आवर्तन काळात कालव्याच्या परिसरातील रोहीत्रांचा वीजपुरवठा खंडित केल्याने त्याचा फटका पिकांना बसत आहे. त्यामुळे आवर्तन कालावधीत कालव्याच्या परिसरातील रोहीत्रांचा वीजपुरवठा खंडित करू नये अशी मागणी पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.

खडकवासला धरणाच्या नवीन मुळा-मुठा कालव्यातून दौंड, इंदापूर तालुक्यातील नगरपरिषद, ग्रामीण पाणीपुरवठा योजना व शेतीसाठी पहिले उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. तसेच कालव्याचे पाणी ३ एप्रिल रोजी इंदापूर पर्यंत पोचले, मात्र याचवेळी रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी दौंड, इंदापूर व हवेली तालुक्यात कालव्याच्या परिसरातील रोहीत्रांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उरुळी कांचन (ता. हवेली) पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी शशिकांत काळे शुक्रवारी (ता. ६) आपल्या पथकासमवेत शिंदवणे, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची, तरडे, उरुळी कांचन या भागातील रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेले होते. याचवेळी जमलेल्या शेतकऱ्यांनी काळे यांना विरोध केला व शेतीसाठी पाणी मिळावे अशा मागणीचे निवेदन आमदार बाबुराव पाचर्णे यांच्याकडे देणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील शेतकरी लक्ष्मण भोंडवे म्हणाले,"उन्हाळ्यामध्ये शेतीसाठी आवर्तन असताना देखील पाटबंधारे विभाग इंदापूर व दौंड तालुक्याचा पाणी प्रश्न पुढे करून हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय करीत आहे. एका रोहित्रावर सुमारे ५ ते १० विहिरी अवलंबून आहेत. त्यामुळे संपूर्ण रोहीत्राचा वीजपुरवठा खंडित करण्याऐवजी केवळ कालव्याच्या पाण्यावर थेट अवलंबून असणाऱ्या उपसा सिंचन योजनांचाच वीजपुरवठा खंडित करावा व कालव्याच्या पाझर पाण्यावर अवलंबून असणाऱ्या विहिरींचा वीजपुरवठा सुरळीत ठेवावा. त्याचबरोबर कालव्यावरील अनधिकृत सायफनवर कारवाई करावी." 

खडकवासला धरणातून २४ मार्चपासून सोडण्यात आलेले उन्हाळी आवर्तन साधारणपणे १० मे पर्यंत सुरु राहणार आहे. तत्पूर्वी इंदापूर व दौंड तालुक्याला कालव्याच्या पूर्ण क्षमतेने पाणी पोहोचविण्यासाठी आवर्तन कालावधीच्या निम्म्या कालावधीत हवेली व दौंड तालुक्यातील कालव्याच्या परिसरात असलेल्या रोहीत्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. तसेच शक्य त्या ठिकाणी केवळ कालव्यावर थेट अवलंबून असणाऱ्या उपसा सिंचन योजनांचाच वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश शाखा अभियंत्यांना देण्यात आले आहेत. यामुळे हवेली व दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला सहकार्य करावे, असे उपविभागीय अभियंता एस. आर. पवार यांनी सांगितले.

Web Title: dont cut the power while water supply