हॉल तिकीट विसराल, तर परीक्षेला मुकाल !

हॉल तिकीट विसराल, तर परीक्षेला मुकाल !

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी केवळ निळ्या शाईचा पेन वापरण्याची सक्ती केली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने मात्र निळ्या किंवा काळ्या शाईचा पेन वापरण्याची मुभा विद्यार्थ्यांना दिली आहे. तसेच, प्रवेशपत्र (हॉल तिकीट) असल्याशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही, त्यामुळे ते न विसरता सोबत ठेवावे लागणार आहे. परीक्षा कक्षात मोबाईलबंदीदेखील करण्यात आली आहे. 

दहावी, बारावीची परीक्षा जवळ आली, की विद्यार्थी धास्तावतात; पण परीक्षेला आनंदाने सामोरे जाण्यासाठी काही नियम शिक्षण मंडळे जाहीर करीत असतात. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळानेही काही सूचना विद्यार्थ्यांसाठी जारी केल्या आहेत. यातील महत्त्वाची सूचना म्हणजे अनेक खासगी क्‍लास वा खासगी व्यक्ती परीक्षेचे वेळापत्रक छापून ते वितरित करतात. त्या तारखा चुकण्याची शक्‍यता असते. त्यामुळे राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरील किंवा शाळेकडील वेळापत्रकच गाह्य धरावे. 
प्रवेशपत्र नसेल तर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा कक्षात पुस्तक, कागद, मोबाईल बंदी करण्यात आली आहे. पेपरफुटी वा अफवा पसरविण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी मंडळाने हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेपूर्वी अर्धा तास परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. उत्तरपत्रिकेवर चिकटविण्यासाठी बारकोड दिला जातो, विद्यार्थ्यांनी तो आपल्याच बैठक क्रमांकाचा आहे का, याची खात्री करून घ्यायची आहे. 

राज्य मंडळाच्या दहावी, बारावी परीक्षेतील लिखाणासाठी निळ्या आणि काळ्या शाईचा पेन चालणार आहे. अन्य रंगाचे कोणतेही पेन वापरता येणार नाहीत. परीक्षेला येताना गणवेश घालावा की नाही, याबाबत कोणत्याही सूचना राज्य मंडळाने दिलेल्या नाहीत. उत्तरपत्रिकेवर इतरत्र कोठेही बैठक क्रमांक लिहिणे वा अन्य खुणा करणे, या सर्व गोष्टी कॉपी समजल्या जाणार आहेत. त्यामुळे हे प्रकार टाळण्याचे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे. 

"सीबीएसई'साठी निळ्या शाईचा पेन 

"सीबीएसई'च्या विद्यार्थ्यांना केवळ निळ्या शाईचा पेन त्याबरोबरच पेन्सिल, खोडरबर, मोजपट्टी, शार्पनर, भूमितीचे साहित्य, रंग, ब्रश एवढेच साहित्य आणता येईल. हे सर्व साहित्य विद्यार्थ्यांनी पारदर्शक पिशवीत आणण्याच्या सूचना केंद्रीय शिक्षण मंडळाने जारी केल्या आहेत. या मंडळानेही परीक्षा केंद्रात मोबाईल आणि इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे नेण्यास मनाई केली आहे. परीक्षा देणारा विद्यार्थी हा नियमित असेल, तर त्याला शाळेच्या गणवेशात तसेच सकाळी दहापूर्वी परीक्षा केंद्रात येण्याची सक्तीही या मंडळाने केली आहे. 

परीक्षेला सुरवात    राज्य बोर्ड         सीबीएसई 
दहावी                   1 मार्च            7 मार्च 
बारावी                 21 फेब्रुवारी        2 मार्च 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com