अनधिकृत बांधकामांबाबत राष्ट्रवादीची भूमिका दुटप्पी - लक्ष्मण जगताप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

पिंपरी - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भ्रष्टाचारी लोक अनधिकृत बांधकामांबाबत पोकळ आश्‍वासने देऊन दुटप्पी भूमिका घेत आहेत. एकीकडे बांधकाम नियमित करणार, असे जाहीरनाम्यात सांगून मते मागतात आणि दुसरीकडे अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी वृत्तपत्रांमधून निविदा मागवतात. ही शहरातील 25 लाख नागरिकांच्या डोळ्यांमध्ये निव्वळ धूळफेक आहे, असा आरोप भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी केला आहे.

जगताप यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये प्राधिकरण, महापालिका आणि एमआयडीसी, अशा तीन स्वायत्त संस्था आहेत. त्यांच्या हद्दीमध्ये सुमारे अडीच लाखांहून अधिक अनधिकृत बांधकामे आहेत. राज्यातील इतरही महानगरपालिका क्षेत्रांमध्ये लाखो अनधिकृत बांधकामे आहेत. ही बांधकामे नियमित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कायमस्वरूपी धोरणात्मक निर्णय लवकरच घेणार आहेत. त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने पाठपुरावा केला जात आहे. यामुळे राज्याबरोबरच शहरातील लाखो कुटुंबीयांना निश्‍चितच दिलासा मिळणार आहे.

राज्य सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात असलेली महापालिका शहरातील 25 लाख नागरिकांच्या डोळ्यांत धूळफेक करीत आहे. महापालिकेने अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी वृत्तपत्रांतून निविदा जाहिरात दिली आहे. महापालिकेने 31 डिसेंबरला निविदा क्र. 362 प्रमाणे विविध वृत्तपत्रांतून ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने एकूण दोन कोटी 86 लाखांहून जास्त रकमेची बारा महिने मुदतीची निविदा मागविली आहे. अशी दुटप्पी भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सुज्ञ मतदार उद्या (मंगळवारी) होणाऱ्या मतदानात घरचा रस्ता दाखवील, असेही जगताप यांनी पत्रकात म्हटले आहे.

Web Title: The double role of NCP unauthorized construction