esakal | रावस, पापलेट, सुरमईच्या भावात दुप्पटीने वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

रावस, पापलेट, सुरमईच्या भावात दुप्पटीने वाढ

रावस, पापलेट, सुरमईच्या भावात दुप्पटीने वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड : तौक्ते चक्रीवादळामुळे खाडी आणि समुद्रातील थांबलेली मासेमारी अद्याप सुरू झाली नाही. हे चक्रीवादळ निवळले असले तरी किनारपट्टीवर उंच लाटा उसळत असून समुद्रात जोराने वारे वाहत आहेत. त्यामुळे मासळीची आवक सुमारे ५० ते ६० टक्क्यांनी घटली आहे. बाजारात सध्या आवक कमी आणि मागणी जास्त आहे. त्यामुळे रावस, पापलेट, सुरमई, हलवा, बोबींलच्या भावांत दुप्पटीने वाढ झाली आहे.(Doubled in price of Rawas, Paplet, Surmai fish expensive due to Tauktae cyclone)

पुण्यातील बाजारात सध्या सुमारे १० टन मासळीची आवक होत आहे. समुद्र किनारपट्टीवरील मासेमारी थांबली आहे. लाटांमुळे मासेमारीसाठी अडथळे निर्माण होत आहेत. एकीकडे मासळीची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे, तर दुसरीकडे ग्राहकांकडून मासळीला मोठी मागणी होत आहे. सध्या शहरात हार्नेबंदर, अलिबाग, रत्नागिरी, मुंबई येथून मासळीची आवक होत आहे. आवक कमी होत असल्याने ग्राहकांना विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेली मासळीची खरेदी करावी लागत असल्याचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा १० लाखांचा आकडा पार

गुजरातमधून पुण्याच्या बाजारात मासळीची आवक होत असते. मात्र, तौक्ते चक्रीवादळामुळे समुद्रातील बोटी आणि जहाज बाहेर आहेत. समुद्रातून परतलेले जहाज अद्याप मासेमारीसाठी गेले नाहीत. त्यामुळे गुजरातमधून अत्यल्प आवक होत आहे. जोराचे वारे आणि सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील मासेमारीतही घट झाली आहे. त्यामुळे पुण्यात मासळीची आवक कमी होत असल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

घाऊक बाजारामधील

किलोचे भाव (रुपयांत)

पापलेट : ८०० ते ९०० रुपये

बोबिंल : २४० ते ३००

सुरमई : ९००

हलवा : ८०० ते ९००

रावस : ८०० ते ८५०

-तौक्ते चक्रीवादळामुळे कमी झालेली आवक ‘जैसे थे’

-बाजारात सध्या सुमारे १० टन मासळीची आवक

-पुण्यात अलिबाग, रत्नागिरी, मुंबई व हार्नेबंदर येथून आवक

-गुजरातमधूनही सध्या मासळीची अत्यल्प आवक

हेही वाचा: उजनीचं पाणी पेटलं; शरद पवारांच्या घराच्या सुरक्षेत वाढ!