'सरकारला उद्योग चालविता येत नाही'

mccia-award
mccia-award

पुणे-  ‘‘देशातील पुढाऱ्यांमध्ये अशी मानसिकता आली आहे, की खासगी क्षेत्रापेक्षा सरकार चांगल्या प्रकारे उद्योग-व्यवसाय करू शकते. पण, सरकारला उद्योग चालविताच येत नाही. सरकार एक हत्ती असून, त्याला उडता येत नाही,’’ अशा शब्दांत ‘फोर्स मोटर्स लि.’चे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया यांनी गुरुवारी टीका केली.

‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर’ (एमसीसीआयए)तर्फे गुरुवारी विविध पुरस्कारांचे डॉ. फिरोदिया यांच्या हस्ते वितरण करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. ‘एमसीसीआयए’चे अध्यक्ष प्रदीप भार्गव, महासंचालक प्रशांत गिरभान या वेळी उपस्थित होते.

‘‘सरकारने देशात प्लॅंट आणि मशिनरीवर मोठी गुंतवणूक केली. त्यावर सरकार दरवर्षी शेकडो कोटी रुपये खर्च करते. मात्र, त्यातून काहीच उत्पन्न मिळत नाही. उद्योग-व्यवसाय करण्याचे काम प्रायव्हेट सेक्‍टरचे आहे. ज्यामध्ये नवीन निर्माण करण्याची क्षमता आहे ते उद्योजक. ते कोठेही असू शकतात. मात्र, सरकारमध्ये नाही. त्यामुळे सरकारी उद्योगाकडून काहीतरी  नवीन निर्माण होईल, ही अपेक्षा सोडून द्यायला पाहिजे,’’ असे फिरोदिया म्हणाले. 

भार्गव म्हणाले, ‘‘पुरस्कार वितरण सोहळा हा जिंकल्याचा उत्सव आहे. यात कोणी हरले नाही. तुम्ही काय साकार करताय, याची सध्या स्पर्धा आहे. त्यात ‘एमसीसीआयए’ महत्त्वाची भूमिका बजावत आहे.’’ 

शिक्षण महत्त्वाचे असले, तरी केवळ त्यावर अवलंबून राहून चालणार नाही. आता शिक्षण, उद्योग, तत्त्वे एकत्र आले; तरच भविष्यातील भरभराट होते. संपत्ती निर्माण करणे म्हणजे शूद्र, अशी प्रथा निर्माण झाली आहे. नवीन निर्माण करून त्यातून संपत्ती निर्माण करायची व मग ती वाटायची, असा सध्या ट्रेंड आहे. 
- डॉ. अभय फिरोदिया, अध्यक्ष, फोर्स मोटर्स लि.

यांना मिळाले पुरस्कार
प्रशांत पानसरे, विजय देशपांडे आणि चैतन्य जोशी यांना ‘गो. स. पारखे’ पुरस्कार देण्यात आला. सुनील नाईक आणि प्रमोद वैद्य यांना ‘डॉ. आर. जे. राठी’ पुरस्कार, कृष्णन कोमांडूर, रितू छाब्रिया आणि सपना राठी यांना ‘बी. जी. देशमुख’ पुरस्कार, आशुतोष गोखले आणि यतीन तांबे यांना ‘किरण नातू स्मृती उद्योजकता’ पुरस्कार विभागून प्रदान करण्यात आला. उज्ज्वला गोसावी आणि प्रीती रासकर या महिला उद्योजकांना ‘रमाबाई जोशी’ पुरस्कार विभागून देण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com