मंचर : बाह्यवळण रस्त्यांची कामे लागणार मार्गी : डॉ. अमोल कोल्हे

मंचर : बाह्यवळण रस्त्यांची कामे लागणार मार्गी : डॉ. अमोल कोल्हे

मंचर : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील राजगुरुनगर, मंचर, चांडोली व आळेफाटा येथील बाह्यवळण रस्त्यांच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. येत्या 2 व 17 मार्च रोजी निविदा उघडणार आहेत. त्यामुळे गेली अनेक वर्षे रखडलेली बाह्यवळण रस्त्याची कामे मार्गी लागणार आहेत. जून महिन्याच्या अखेरीपर्यंत रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

भूसंपादनास असणारा नागरिकांचा विरोध व अन्य कारणांमुळे रखडलेली बाह्यवळण रस्त्यांची कामे मार्गी लावून वाहतूक कोंडीतून जनतेची सुटका करावी, यासाठी गेले काही महिने सातत्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी यांच्यासह संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेतलेल्या आहेत. भूसंपादनातील बहुतांशी आक्षेपांचे निराकरण करण्यात यश आले आहे. दिल्लीत अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर राजगुरुनगर, मंचर, कळंब व आळेफाटा येथील बाह्यवळण रस्त्यांच्या कामांच्या निविदा प्रक्रियेस मंजुरी मिळाली. या निविदांची मुदत राजगुरुनगर व मंचरसाठी 2 मार्च; तर कळंब आणि आळेफाट्यासाठी 17 मार्चपर्यंत आहे.

नारायणगाव व खेड घाटाचे बाह्यवळण रस्त्याचे काम गतीने सुरू असून, मार्च अखेरपर्यंत एकेरी वाहतूक सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संबंधित कंत्राटदाराला दिले आहेत, असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

दरम्यान, सहा पदरीकरणासाठीची 80 टक्के जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात येताच या कामाच्या निविदा प्रक्रिया सुरू करण्यास मंजुरी मिळावी, यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी सांगितले.

भूसंपादन दोन महिन्यांत पूर्ण करणार

नाशिक फाटा ते चांडोली या टप्प्यातील रस्त्याला प्राधान्य देणार असून, पिंपरी-चिंचवड हद्दीतील भूसंपादनाचे क्षेत्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात येण्यास लागणारा विलंब लक्षात घेऊन या महामार्गाचे नाशिक फाटा ते मोशी (इंद्रायणी नदीपर्यंत) आणि मोशी ते चांडोली, असे दोन भाग केले आहेत. मोशी ते चांडोली या टप्प्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया येत्या 2 महिन्यात पूर्ण करून देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com