संतांच्या अभंगातून घडणारे अनोखे वारीदर्शन (भाग- २) 

wari 2.jpg
wari 2.jpg

Wari 2020 : श्रीसकलसंत गाथेच्या दुसऱ्या खंडात भानुदास, जनार्दनस्वामी, एकनाथ, तुकाराम, कान्होबा, रामेश्‍वरभट्ट व निळोबा आदी संतांच्या अभंगांचा समावेश आहे. वारकरी संप्रदाय वर्धिष्णू व्हावा म्हणून वारकरी संतांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. वारकरी संप्रदायाच्या भागवतधर्म - मंदिराचे खांब म्हणून निर्देश असलेले संत एकनाथ व तुका झालासे कळस म्हणून उल्लेखनीय ठरलेले संत तुकाराम यांची अभंगरचना या खंडात समाविष्ट आहे. संतांच्या अभंगांच्या रचना विविध विषयांच्या विभागणीनुसार दिल्या आहेत. सुमारे अकराशे पानांच्या या खंडात अभंगांचे विस्तृत संकलन आहे. त्यांपैकी निवडक अभंगांतून वारी, वारकरी, पांडुरंग याविषयी महत्त्वाची निरीक्षणे नोंदविली आहेत.

 श्रीभानुदास : भानुदासांची विठ्ठलभक्ती त्यांनी विजयनगरच्या राजाकडून मूर्ती पुन्हा पंढरपूरला आणल्याच्या प्रसंगातून सिद्ध होते. भानुदासांच्या रचनातून विठ्ठलभक्ती, विठ्ठलाचे नामस्मरण, पंढरपूर महात्म्य आणि वारीचे महत्त्व स्पष्ट होते. पंढरपूर वारीविषयी सांगताना "देखोनिया पंढरपूर' या अभंगात टाळ-मृदंग, दिंड्या-पताकांचा मेळ पाहून होणारा आनंद व्यक्त केला आहे, तर पंढरीचा नेम आपल्या कुळात असल्याचेही त्यांनी एका अभंगातून म्हटले आहे. पंढरीची वाट सोपी आहे. पंढरीस पांडुरंगाचे दर्शन उल्हासाने घेतले तर जप, तप, योग, तीर्थे यांची आवश्‍यकता नाही, असे सांगणाऱ्या भानुदासांनी "आले वारकरी करिती जयजयकार' या अभंगात गरूडटके भार घेऊन निघालेल्या दिंडीपुढे नाचणाऱ्या हर्षोत्फुल वारकऱ्याचे वर्णन करून हरिनामातून मिळणारा आनंद सांगितला आहे. 

जनार्दनस्वामी : जनार्दनस्वामींची रचना प्रामुख्याने गुरूस्तुती श्रीनाथ उपदेश या स्वरूपाची असली, तरी विठ्ठलमंत्र अंतःकरणामध्ये जपावा, असा विचार ते सांगतात. त्याचबरोबर विठ्ठलनामाच्या उच्चारणाशिवाय दुसरे साधन नसल्याचेही सांगतात. त्यांनी एकनाथांना केलेला उपदेश हा एकनाथांच्या कर्माची प्रेरणा म्हणता येईल. 

एकनाथ महाराज : "जनार्दन एकनाथ। खांब दिला भागवत' या अभंगचरणातून संत एकनाथांच्या कार्याचे महत्त्व लक्षात येते. ज्ञानेश्‍वरी प्रतीचे शुद्धीकरण असो वा वारकरी संप्रदायाच्या कार्याच्या समर्थनार्थ अभंग, भारूडे, गौळणी यांची रचना करणे असो, त्यात एकनाथांच्या वेगळेपणाचा अविष्कार घडतोच. ज्ञानदेव - नामदेवांप्रमाणेच एकनाथांच्या रचनांचाही वारकरी संप्रदाय वर्धिष्णू करण्यात मोलाचा सहभाग लाभलेला आहे. एकनाथांच्या रचनेत कृष्णासंबंधी रचना, यशोदा राधा संवाद, पंढरीमहात्म्य, विठ्ठलमहात्म्य, उपदेश आदी एकूण चार हजार अभंगरचनांचा समावेश आहे. संत एकनाथांच्या विविध रचनांपैकी विठ्ठलाविषयी रचनांतून पंढरपूर क्षेत्रास पावन क्षेत्र, विश्रांतीस्थान, मुमुक्षूंचे माहेर, भूवैकुंठ असे संबोधून पंढरपुराविषयी त्यांना वाटणारा जिव्हाळा व्यक्त झाला आहे. एकनाथांनी वारकरी हा अर्हनिश- वारी करणारा, वारी चुको नेदी - हे तत्त्व मनी बाळगणारा, आषाढी, कार्तिकी मानणारा गोविंदास आळविणारा म्हणून संसारात धन्य असणारा असा चितारला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

साधन ते सार पंढरीची वारी असे एकनाथांनी एका अभंगात म्हटले आहे. वारीचे वर्णन कुंचे पताका, गरूडटके आणि वैष्णवांचा मेळा याप्रमाणे ते करतात. 
"पंढरीची वारी आहे ज्याचे घरी, तोचि अधिकारी धन्य जगी।' अशी वारकऱ्यांची श्रेष्ठता सांगतात. "ज्याच्या घरी पंढरीची वारी आहे तो देवाचा आवडता' असेही एकनाथ आपल्या अभंगातून सांगतात. भोळे-भोळे वारकरी असे वारकऱ्यांना संबोधून या वारकऱ्यांचा सहवास मिळावा, अशी देवाकडे ते प्रार्थना करतात. या वारकऱ्यांपुढे नतमस्तक व्हावे, असेही म्हणतात. वारकरी हरीचे डिंगर आहेत, तर विठ्ठल हा देव लावण्याचा पुतळा आहे, पताकांचे भार वाहणारे हरीचे दास आहेत, तसेच तुळशीहार गळ्यात, मुद्रांचे शृंगार, नामाचा गजर, टाळ, घोळ, दिंडी, गरूडटके, आनंदाने नाचणारा वारकरी हा रम्य सोहळा आहे.

पंढरीचा राजा - विठ्ठल याच्या चरणस्पर्शातून संसाराचे पांग फिटतात, तसेच विषयवासना सुटतात, असेही एकनाथांनी श्रद्धेने म्हटले आहे. संत एकनाथांनी बारीकसारीक गोष्टींतून, स्पष्टीकरणातून विठ्ठलाची भक्ती, नामस्मरण त्याशिवाय वारीची श्रेष्ठता अभंगातून सांगितली आहे. एकनाथांना वारीचा सोहळा प्रिय आहे, तसेच त्यांना वारकरी हरीच्या नामाचा गजर करणारा सज्जन म्हणून वंदनीय आहे. एकूण वारीमय जीवन, विठ्ठलाची भक्ती, संतांचा सहवास यातून जीवनाचा आनंद अनुभवावा, असे संत एकनाथांनी सांगितले आहे. 

श्रीसंत तुकाराम महाराज : श्री तुकाराम महाराजांच्या घराण्यात अगोदरपासून विठ्ठलभक्ती होती. त्यांचे एक पूर्वज विश्‍वंभरबुवा पंढरपूरच्या वारीला जात असत. 
तुकाराम महाराज हे विठ्ठलभक्तीने भारावलेले होते. पांडुरंगाविषयी श्रद्धाभाव त्यांच्या अभंगरचनेतून स्पष्ट झाला आहे. त्यांच्या अभंगांची संख्या 4092 इतकी आहे. त्यात विठ्ठलमहात्म्य, नामस्मरण श्रेष्ठता, पंढरीमहात्म्य, वारी-वारकरी यांसंबंधीच्या रचनांचा, तसेच उपदेशपर, प्रबोधनात्मक रचनांचा समावेश आहे. 
विठ्ठलाचे वर्णन "सुंदर ते ध्यान उभे विटेवरी' या शब्दात तुकारामांनी केले आहे. पंढरी हे त्यांना भूमीवरी वैकुंठ वाटते. "कोटी तीर्थापेक्षा' पंढरी पाहणे श्रेष्ठ आहे. विठ्ठल हे माऊलीरूप आहे. पंढरीस जाणे म्हणजे माहेरी जाण्याचा अनुभव घेणे होय. "दीनांचा सोयरा पांडुरंग पंढरपुरास आहे' अशी तुकारामांची भावना आहे. या संसारी येऊन पंढरीसी जावे, असेही त्यांनी म्हटले आहे. 
पंढरीचे वारकरी हे मोक्षाचे अधिकारी आहेत. "होईन भिकारी पंढरीचा वारकरी' असे सांगणारे तुकाराम महाराज पुनःपुन्हा "होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी।' असेही म्हणतात. "हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा' असेही पांडुरंगास विनवतात. पंढरीची वारी माझ्या घरी आहे, त्यामुळे दुसरे तीर्थव्रत करणे नाही, असे स्पष्ट सांगतात. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"पंढरीचे भूत मोठे। आल्या गेल्या झडपी वाटे।' अशी पंढरीची श्रेष्ठता सांगताना "आवडे पंढरी भीमा पांडुरंग' असे ते म्हणतात. पंढरीस गेल्यावर भूक-तहान यांची आठवण न होऊन जीवास सुख मिळते. पंढरीचा वारकरी हा वारी न चुको या ईर्षेने वारी करणारा, पांडुरंगाची सेवा करणारा असतो. पंढरपूरच्या संतसोहळ्याचे वर्णन "खेळ मांडियेला वाळवंटी घाई। नाचती वैष्णव भाई रे।' या अभंगातून विस्तृतपणे केले आहे. वैष्णववीरांच्या सोहळ्याने भवसागर तरून जाण्यासाठी पायवाट सोपी केली आहे. वारी, सोहळा, वैष्णव, दिंड्या-पताका, नामाचे गजर यांसारख्या शब्दांतून वारी आणि वारकरी केवळ विवेचन नव्हे, तर त्याविषयी श्रद्धा संत तुकारामांनी व्यक्त केली आहे. आषाढी-कार्तिकीच्या भक्तीच्या सोहळ्याच्या विशाल स्वरूपाचे वर्णनही तुकारामांनी अनेक अभंगांतून केले आहे. पांडुरंगाचे नामस्मरण कीर्तन करणाऱ्या तुकारामांचे जीवन पांडुरंगमय झाले होते. साक्षात पांडुरंगाचे दर्शन व्हावे ही अपेक्षा ठेवणाऱ्या तुकारामांचे सदेह वैकुंठगमन झाले. अशा रीतीने विठ्ठलाशी एकरूप झालेल्या तुकारामांची विठ्ठलप्रीती त्यांच्या अभंगात ठायी-ठायी आढळते.


संत बहिणाबाई या तुकाराम महाराजांच्या शिष्या. त्यांचे अभंग विठ्ठलभक्तीने भारावलेले आहेत. "संतकृपा झाली। इमारत फळा आली' या अभंगातून बहिणाबाईंनी वारकरी संतांच्या कार्याचा गौरव केला आहे. 
याशिवाय कान्होबा महाराज, निळोबाराय यांची अभंगरचना वारकरी संत मालिकेत विठ्ठलाविषयी श्रद्धाभाव जोपासणारी गणली जाते. त्यांचे अभंग सकल संतगाथेत आहेत. संतांची अभंगवाणी हे महाराष्ट्राचे आणि मराठी भाषेचे विशेष ठरलेले आहेत. संतवाणीचा उगम निवृत्तीनाथांपाशी आणि परिणती निळोबारायांपाशी झाली आहे. निवृत्तीनाथ म्हणजे ज्यांनी भागवतधर्म मंदिराचा पाया रचला त्या ज्ञानदेवांचे गुरू, तर निळोबा म्हणजे त्या मंदिरावर कळसरूप झाले त्या तुकारामांचे शिष्य. अशा प्रकारे भागवत संप्रदायाला प्रेरणा देणाऱ्यांचे प्रेरक व वैभवाचे शिखर प्राप्त करून देणाऱ्याचे वारस या दोन टोकांमध्ये अभंगवाणी पसरली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com