डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

पुणे - पांढरी शुभ्र वस्त्रे परिधान केलेल्या लाखो आंबेडकर अनुयायांनी मंगळवारी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या 60 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले. हातात निळा ध्वज, हृदयात बाबासाहेबांचे विचार आणि मुखातून उमटणारा त्यांच्या नावाचा जयघोष, अशा वातावरणात पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी जनतेने मोठ्या संख्येने गर्दी केली.

पुणे - पांढरी शुभ्र वस्त्रे परिधान केलेल्या लाखो आंबेडकर अनुयायांनी मंगळवारी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या 60 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले. हातात निळा ध्वज, हृदयात बाबासाहेबांचे विचार आणि मुखातून उमटणारा त्यांच्या नावाचा जयघोष, अशा वातावरणात पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी जनतेने मोठ्या संख्येने गर्दी केली.

शहरातील समाजमंदिरे, बुद्धविहार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पहाटेपासूनच सामूहिक बुद्धवंदनेच्या कार्यक्रमास प्रारंभ झाला होता. ठिकठिकाणी भगवान गौतम बुद्ध व बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. बुद्धवंदना, त्रिशरण, पंचशीलाचे स्वर सगळीकडे घुमत होते. अभिवादनानंतर शहर व जिल्ह्यातील आंबेडकर अनुयायांची पावले पुणे स्टेशन येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी वळली. अनेक जण आपल्या कुटुंबीयांसमवेत आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दाखल झाले होते. युवक-युवती, महिलांची संख्या लक्षणीय होती. चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकही या महामानवाच्या कार्यकर्तृत्वासमोर नतमस्तक झाले. त्यानंतर पुतळ्याच्या परिसरातील स्टॉल्सवर विविध प्रकारच्या वस्तू, पुस्तके, छायाचित्रे घेण्यास नागरिकांनी पसंती दिली.

विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटनांकडूनही डॉ. आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली.

आंबेडकरी विचारांचा जागर, स्त्रीजन्माचे स्वागत करणाऱ्या पालकांचा सत्कार, व्यसनमुक्त अभियान, गरीब विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप, विद्यार्थ्यांना आंबेडकर संग्रहालयाची भेट घडविणे यांसारखे असंख्य विधायक उपक्रम आज राबविण्यात आले.

महापालिकेतील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास महापौर प्रशांत जगताप व उपमहापौर मुकारी अलगुडे यांनी पुष्पहार अर्पण केला. रिपब्लिकन पक्षातर्फे (आठवले गट) शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. या वेळी एम. डी. शेवाळे, नवनाथ कांबळे, बाळासाहेब जानराव, असित गांगुर्डे, हनुमंत साठे, अशोक शिरोळे उपस्थित होते. शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे पक्षाचे उपाध्यक्ष अजित दरेकर व मुख्तार शेख यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. या वेळी हाजी नदाफ, विनायक मुळे, लता राजगुरू, नारायण चव्हाण, मुकेश धिवार, सचिन सावंत, राहुल तायडे आदी उपस्थित होते. इंदिरा सार्वजनिक ग्रंथालयातर्फे उत्तम भूमकर यांनी अभिवादन केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे मयूर गायकवाड, शहर उपाध्यक्ष आनंद सवाणे, शौर्य प्रतिष्ठानतर्फे धनराज घागरे यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. दलित पॅंथरतर्फे सुखदेव सोनवणे व कार्यकर्त्यांनी पुतळ्यास अभिवादन केले.

भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलातर्फे आयोजित संचलनात 150 जणांनी सहभाग घेतला. के. बी. मोटघरे, एम. डी. खरात यांच्या नेतृत्वाखाली कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुतळा ते पुणे स्टेशन येथील आंबेडकर पुतळ्यादरम्यान संचलन झाले. भारिप-बहुजन महासंघातर्फे प्रदेशाध्यक्षा ऍड. वैशाली चांदणे यांनी भाषणाद्वारे प्रबोधन केले.

क्रांतिज्योती पुणे या संस्थेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी "24 तास आंबेडकरी विचारांचा जागर' हा कार्यक्रम घेतला. सम्राट अशोक सेनेतर्फे नीलेश म्हस्के, योगेश शेलार, रोहीत लोंढे यांनी अभिवादन करण्यात आले.

दलित स्वयंसेवक संघातर्फे सोपान चव्हाण, प्रभाकर वैराळ यांनी, तर भाजपचे शहर उपाध्यक्ष असलम खान यांनीही अभिवादन केले. रिपब्लिकन बहुजन सोशालिस्ट पार्टीचे मिलिंद अहिरे यांनी लष्कर भागातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याभोवती स्वच्छता ठेवण्याची मागणी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे केली. फुले, साठे आंबेडकर विचार फाउंडेशनच्या औंध व वाघोली शाखेने व्यसनमुक्त अभियान राबविले, तर उंड्री-पिसोळी शाखेतर्फे मुलींच्या आई-वडिलांचा सन्मान केला. या वेळी मोहन सोनवणे, सुरेश वकारिया उपस्थित होते. "एआयएमआयएम'तर्फे अंजुम इनामदार, महाराष्ट्र जोशी समाज संघटनेतर्फे प्रदेशाध्यक्ष कैलास हेंद्रे यांनी, तर रिपब्लिकन जनशक्तीतर्फे शैलेंद्र मोरे, भिमशक्तीच्यावतीने शिलार रतनगिरी, समता सामाजिक संस्थेतर्फे विजय भोसले यांनी आदरांजली वाहिली. सामाजिक समरसता मंचातर्फे महेश करपे यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. भाजपच्या डेक्कन मॉडेल कॉलनीतील पदाधिकारी संदीप चव्हाण यांनी बुद्धविहारांना भेटी दिल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस शिवाजी गर्जे, मुनाफ हकीम, संजय बोरगे, राजेश गांगण, शंकर शिंदे, वैजनाथ वाघमारे, पंडित कांबळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवनामध्ये डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. भाजपचे किरण कांबळे, जयप्रकाश पुरोहित, मामा शिवले यांनीही आदरांजली वाहिली.

विद्यार्थ्यांनी समजून घेतले डॉ. आंबेडकर
बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पीयूष शहा यांनी शालेय विद्यार्थ्यांना सिंबायोसिसजवळील डॉ. आंबेडकर संग्रहालयाची भेट घडविली. चंद्रकांत दरोडे विद्यालय, हुतात्मा राजगुरू विद्यालय, पांडवनगर येथील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. भारतीय बौद्ध महासभेच्या पुणे विभागाचे अध्यक्ष के. बी. मोटघरे यांनी विद्यार्थ्यांसमोर बाबासाहेबांचे जीवनचरित्र उलगडले. तसेच मोटघरे यांनी संग्रहालयातील प्रत्येक वस्तूचे महत्त्वही पटवून दिले. यावेळी नरेंद्र व्यास, मुख्याध्यापिका शैलजा जगताप, संगीता अंत्रे, जयश्री पाटील, रोहिणी कांबळे आदी उपस्थित होते.

Web Title: dr. babasaheb ambedkar mahaparinirvan din