डॉ. आंबेडकर यांच्या वापरातील वस्तू पाहण्याची संधी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दैनंदिन वापरातल्या वस्तू आणि पुस्तकांसहित हस्तलिखिते, यांसह जुन्या काळातील लाकडावरील कलाकुसर आणि पाषाणात घडविलेल्या दुर्मिळ वस्तू ते अगदी क्रिकेटपटू युवराजसिंगसह अन्य खेळाडूंनी परिधान केलेले टी-शर्ट, बॅटवरच्या खेळाडूंच्या सह्यांचा संग्रह एकाच प्रदर्शनात पाहायला मिळत आहे. 

पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दैनंदिन वापरातल्या वस्तू आणि पुस्तकांसहित हस्तलिखिते, यांसह जुन्या काळातील लाकडावरील कलाकुसर आणि पाषाणात घडविलेल्या दुर्मिळ वस्तू ते अगदी क्रिकेटपटू युवराजसिंगसह अन्य खेळाडूंनी परिधान केलेले टी-शर्ट, बॅटवरच्या खेळाडूंच्या सह्यांचा संग्रह एकाच प्रदर्शनात पाहायला मिळत आहे. 

आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त पुण्यातील बारा संग्रहालयांचे एकत्रित प्रदर्शन सिंबायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाच्या प्रांगणात भरले आहे. पुरातत्व व संग्रहालय विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन (ता. 18) झाले. डॉ. शां. ब. मुजुमदार, संजीवनी मुजुमदार, डॉ. गो. बं. देगलूरकर उपस्थित होते. 20 मे पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी सकाळी अकरा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत विनामूल्य खुले राहणार आहे. यानिमित्त पुण्यातील संग्रहालयांची एकत्रित माहिती देणाऱ्या सचित्र पुस्तिकेचे प्रकाशन झाले. 

डॉ. गर्गे म्हणाले, ""परदेशात हिंसा दाखविणारी संग्रहालये आहेत. अगोदरच्या पिढीने केलेल्या चुका पुढच्या पिढीने करू नयेत, हा संदेश पुढच्या पिढीपर्यंत पोचावा, या उद्देशाने अशी संग्रहालये तेथे उभारली आहेत. संग्रहालयांमुळे स्मृती जपल्या जातात. मात्र, एक "समृद्ध अडगळ' हा संग्रहालयांबाबतचा समज दूर होऊ लागला आहे. भविष्यात ही संग्रहालये ज्ञानपीठ व्हावीत, या दृष्टीने प्रयत्न व्हावेत.'' 

डॉ. देगलूकर म्हणाले, ""लहान मुलांना वस्तुसंग्रहालयाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी नागरिकांनीच त्यांच्या घरातील जुन्या वस्तू एखाद्या कपाटात एकत्रित संग्रहित कराव्यात, त्यामुळे संग्रहालयाविषयीचे शिक्षण घरापासून सुरू होईल.'' 

डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, ""शांतता आणि परस्पर सहकार्यासाठी संग्रहालये शैक्षणिक केंद्रे व्हावीत.'' संजीवनी मुजुमदार म्हणाल्या, ""संग्रहालये ऐतिहासिक ठेवा असून, ती वास्तू आणि व्यक्तींची स्मृती जपतात.'' 

Web Title: Dr. Babasaheb Ambedkar Museum pune