जाऊया आंबेडकर वस्तुसंग्रहालयात (व्हिडिओ)

नीला शर्मा 
गुरुवार, 16 मे 2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाजवत असत ते व्हायोलिन, जेवणासाठीची भांडी, त्यांचा कोट, ते बसत असत ती खुर्ची पाहून रोमांच उभे राहतात. आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिणाऱ्या बाबासाहेबांनी दैनंदिन आयुष्यात वापरलेल्या विविध वस्तू जपणाऱ्या या संग्रहालयात वारंवार जावंसं वाटतं.

पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाजवत असत ते व्हायोलिन, जेवणासाठीची भांडी, त्यांचा कोट, ते बसत असत ती खुर्ची पाहून रोमांच उभे राहतात. आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिणाऱ्या बाबासाहेबांनी दैनंदिन आयुष्यात वापरलेल्या विविध वस्तू जपणाऱ्या या संग्रहालयात वारंवार जावंसं वाटतं.

सिंबायोसिस संस्थेच्या आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तुसंग्रहालय आणि स्मारक आपल्याला खूप काही शिकवून जाणारं आहे. बाबासाहेबांनी वापरलेल्या दोनशे ऐंशी वस्तू येथे आहेत. सुमारे चारशे ऐंशी पुस्तकं व हस्तलिखितांचा दुर्मीळ संग्रह हा मोलाचा ठेवा येथे आहे.

बाबासाहेबांच्या वापरातील कपडे, बूट, सुटकेस, काठी, आराम खुर्ची यांसारख्या विविध वस्तू पाहताना आपल्याला जागच्या जागी खिळल्यासारखं होतं. बाबासाहेबांची पुस्तकं व हस्तलिखितं पाहताना त्यांच्या अभ्यासूपणाबद्दल आदर वाटतो. २२ जानेवारी १९८२ रोजी बाबासाहेबांच्या पत्नी माईसाहेब यांनी हा ठेवा सिंबायोसिस संस्थेच्या स्वाधीन केला. संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी तो जतन करून लोकांसाठी खुला केला. संजीवनी मुजुमदार या संग्रहालयाच्या मानद संचालिका असून, येथील व्यवस्थापन त्यांच्याकडे आहे. रोज सरासरी शंभर व्यक्ती संग्रहालयाला भेट देतात. पुणे महापालिकेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या खास सहली येथे आयोजित केल्या जातात, अशी माहिती संग्रहालयाचे  प्रशासकीय अधिकारी अमित झगडे व समन्वयक सचिन शिंदे यांनी दिली.

Web Title: Dr Babasaheb Ambedkar Museum Symbiosis Pune