मी डॉ. आंबेडकर बोलतोय... 

पीतांबर लोहार
शनिवार, 14 एप्रिल 2018

पिंपरी - "हे बोधिवृक्षा..., तुझ्या छायेखाली बसून तथागतांनी आम्हाला दिव्य संदेश दिला, अत्त दीप भव... स्वयंप्रकाशित व्हा... तू स्वतःच ज्ञानाचा सूर्य आहेस, तुझ्याकडून मिळालेल्या ज्ञानरूपी प्रकाशाची किरणं ओंजळ भरून घेऊन निघालो आहे... माझ्या बांधवांकडे. मला यश दे, असं मागणं मी मागू शकत नाही. कारण तू म्हणतोस... मी मोक्षदाता नाही, मार्गदाता आहे. तू सांगितलेला मार्ग विज्ञानाला प्रमाण मानणाऱ्या धम्माचा आहे. तोच सद्‌धम्म आहे, अशी माझी खात्री पटलेली आहे. म्हणून माझा नवा जन्म होत आहे, असे मी मानतो. प्रज्ञा, शील आणि करुणा या तीन तत्त्वांची सांगड घालून बुद्धाच्या शिकवणीनुसार मी माझे जीवन चालवीन.

पिंपरी - "हे बोधिवृक्षा..., तुझ्या छायेखाली बसून तथागतांनी आम्हाला दिव्य संदेश दिला, अत्त दीप भव... स्वयंप्रकाशित व्हा... तू स्वतःच ज्ञानाचा सूर्य आहेस, तुझ्याकडून मिळालेल्या ज्ञानरूपी प्रकाशाची किरणं ओंजळ भरून घेऊन निघालो आहे... माझ्या बांधवांकडे. मला यश दे, असं मागणं मी मागू शकत नाही. कारण तू म्हणतोस... मी मोक्षदाता नाही, मार्गदाता आहे. तू सांगितलेला मार्ग विज्ञानाला प्रमाण मानणाऱ्या धम्माचा आहे. तोच सद्‌धम्म आहे, अशी माझी खात्री पटलेली आहे. म्हणून माझा नवा जन्म होत आहे, असे मी मानतो. प्रज्ञा, शील आणि करुणा या तीन तत्त्वांची सांगड घालून बुद्धाच्या शिकवणीनुसार मी माझे जीवन चालवीन. बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी... हे स्वगत संपतं आणि रंगमंचावर पाठमोरा उभा असलेला कलाकार प्रेक्षकांकडे तोंड करून म्हणतो, ""माझ्या प्रिय बांधवांनो, मी भीमराव रामजी संकपाळ ऊर्फ डॉक्‍टर आंबेडकर बोलतोय...'' आणि प्रेक्षकांमधून टाळ्यांचा कडकडाट होतो. 

भोसरी एमआयडीसीतील सेंच्युरी एन्का कंपनीतून निवृत्त झालेले कामगार गुलाब ओव्हाळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास "प्रज्ञासूर्य' या एकपात्री प्रयोगातून साकारला आहे. गेल्या दहा वर्षांत त्यांचे 350 प्रयोग झाले आहेत. शनिवारी (ता. 14) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ओव्हाळ यांच्याशी संवाद साधला. 

प्रज्ञासूर्य निर्मितीबाबत ते म्हणाले, ""मुलाच्या सूचनेनुसार मी मागे भांग पाडला, मेकअप केला आणि "तुम्ही बाबासाहेबांसारखे दिसता,' असे तो म्हणाला. तेव्हा ठरविले एकपात्री प्रयोग करायचा आणि संहिता लिहिली. कामगार नाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धांचा अनुभव पाठीशी होता. बाबासाहेबांचे बालपण, शिक्षण, चळवळीतील योगदान आदी प्रसंग साकारले आहेत.'' 

महू या गावी बाबासाहेबांचा जन्म झाला. महू म्हणजे मिल्ट्री हेडक्वार्टर ऑफ ऑरियर्स (एमएचओओ) होय. देशातील लढवय्या सैनिकांचे ते मुख्य केंद्र होते. त्या ठिकाणी बाबासाहेबांचे वडील रामजी सुभेदार होते. त्यांच्याबाबत ज्ञानसूर्यमध्ये बाबासाहेब सांगतात, "आम्ही संस्कृत पंडित व्हावे, ही रामजी बाबांची इच्छा होती..., संत कबीर यांच्या दोह्यांचे त्यांनी आमच्यावर बालपणीच संस्कार केले होते...' बाबासाहेबांच्या जीवनातील सर्वच पैलूंचा आढावा ओव्हाळ यांनी घेतला आहे. 

शिका, संघटित व्हा ! 
"सामाजिक समतेचा रथ मी आणि माझ्या ज्ञात-अज्ञात सहकाऱ्यांनी इथपर्यंत ओढत आणलाय. तो पुढे न्यायचा नसेल, तर नेऊ नका. आहे तिथेच ठेवा. पण तो मागे तरी ओढू नका. त्यासाठी शिका, संघटित व्हा, फक्त न्यायासाठी संघर्ष करा,' असा संदेश देऊन ज्ञानपर्व एकपात्री प्रयोगाचा पडदा पडतो. 

Web Title: Dr. babasaheb ambedkar special story