स्त्रियांना त्यांच्यातील शक्ती ओळखता यायला हवी : डॉ. हिंदुजा

स्त्रियांना त्यांच्यातील शक्ती ओळखता यायला हवी : डॉ. हिंदुजा

पुणे : प्रत्येक स्त्रीमध्ये प्रचंड शक्ती असून, ती काहीही करू शकते; पण ती शक्ती तिला ओळखता आली पाहिजे आणि आपण कोणतेही काम करू शकतो, अशी जिद्द तिच्यात हवी, असे प्रतिपादन प्रसूतीतज्ज्ञ डॉ. इंदिरा हिंदुजा यांनी केले. 

कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे महिला राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, सुरेश रानडे यावेळी उपस्थित होते. वंडर बेबी निर्मितीचे आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या संशोधक मुंबईतील डॉ. इंदिरा हिंदुजा यांना संशोधन पुरस्कार, देशातील पहिल्या आणि एकमेव कमांडो प्रशिक्षक डॉ. सीमा राव यांना महिला साहस पुरस्कार प्रदान करण्यात आला. दोन लाख रुपये आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती अर्थशास्रामध्ये पीएचडी करणाऱ्या रिटा शेटिया यांना देण्यात आले.

डॉ. हिंदुजा पुण्यातील वास्तव्याच्या आठवणी सांगताना त्या म्हणाल्या, "भारत आणि पाकिस्तान आम्ही फाळणीनंतर पुण्यात आलो. येथे पालिकेच्या शाळेत जायला लागले. शाळेतील घसरगुंडीवर खेळताना पडले आणि पाय मोडला. ससूनमध्ये दाखल केले. तेथे उपचार करणाऱ्या डॉक्टर पाहिले. त्यांना पाहून आपण डॉक्टर होण्याची ठरवले. 

डॉ. राव यांनी मार्शल आर्ट आणि सशस्र दलांना कमांडो प्रशिक्षणाचे अनुभव सांगितले. त्या म्हणाल्या, "शाळेत असताना शारीरिक सक्षम नव्हते. पण पती डॉक्टर असून, मार्शल आर्ट करीत होते. त्यांनी प्रोत्साहन दिले. तेथून मीही त्याचे प्रशिक्षण घेतले. गिरगाव चौपाटीवर सराव करताना एका कचरा वेचकाने छेड काढली. त्याला सामोरे जाण्यापूर्वी घाबरले होते. एकाक्षणी बळ एकवटले आणि त्याला लोळवले. माझे स्वप्न होते की देशासाठी काही तरी करावे. मग सशस्र दलांच्या कमांडोंना विविध संरक्षण पद्धतीचे प्रशिक्षण दिले."

"माझे काम शारीरिक कसरतीचे असल्याने मी मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला. माझे पती डॉ. दीपक यांनी त्या निर्णयाचा सन्मान केला. आम्ही मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आणि ठरवून मुलगी दत्तक घेतली. कारण मला माहीत होते की मुलगी देखील पुरुषांसारखी बळकट असते," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रानडे म्हणाले, "पुष्पलता रानडे यांनी कीर्तनाला आयुष्य दिले. त्यातून मिळालेले पैसे आणि त्यांचा लक्ष्मी रस्ता परिसरात मोठा वाडा विकून आलेली रक्कम त्यांनी समाजासाठी काम करणाऱ्यांना संस्थांना देणगी म्हणून दिले. कर्तृत्ववान महिला आणि शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यासाठी आग्रही होत्या. त्यानुसार आम्ही हे पुरस्कार देत आहोत.

रान नाईक म्हणाले, " पुष्पलता रानडे यांना संतती नव्हती. पण मातृहृदयी असल्याने त्यांनी आईप्रमाणे अनेक संस्थांना उदारहस्ते मदत केली, देणगी दिली, हे त्यांचे थोरपणच आहे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com