साहित्याच्या अंगणात विज्ञानकथा फुलाव्यात - जयंत नारळीकर

सुशांत सांगवे - @sushantsangwe
बुधवार, 21 डिसेंबर 2016

पुणे - ‘‘आपण काहीतरी गोष्टीरूपात ऐकले की ते आपल्याला चटकन भावते, जवळचे वाटते. त्यामुळे विज्ञानसुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला घरोघरी पोचवायला हवे; पण सध्या मराठी साहित्यात विज्ञानकथेचा ‘फॉम’ पुरेसा विकसित झालेला नाही. तो व्हावा याकडे लेखकांनी अधिक लक्ष द्यायला हवे,’’ अशी अपेक्षा ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केली.

पुणे - ‘‘आपण काहीतरी गोष्टीरूपात ऐकले की ते आपल्याला चटकन भावते, जवळचे वाटते. त्यामुळे विज्ञानसुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला घरोघरी पोचवायला हवे; पण सध्या मराठी साहित्यात विज्ञानकथेचा ‘फॉम’ पुरेसा विकसित झालेला नाही. तो व्हावा याकडे लेखकांनी अधिक लक्ष द्यायला हवे,’’ अशी अपेक्षा ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केली.

साहित्य क्षेत्रातला महत्त्वाचा सोहळा असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा डोंबिवलीत रंगणार आहे. संमेलनाच्या व्यासपीठावर दरवर्षी एका मान्यवर लेखकाचा किंवा प्रकाशकाचा विशेष सत्कार केला जातो. मराठी साहित्यातील योगदान लक्षात घेऊन यंदा या सत्कारासाठी डॉ. नारळीकर यांची साहित्य महामंडळाने निवड केली आहे. इतर क्षेत्रात कार्यरत राहून साहित्यातही आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या लेखकाचा संमेलनात प्रथमच सत्कार होत आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ने डॉ. नारळीकर यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी ही अपेक्षा व्यक्‍त केली.

डॉ. नारळीकर म्हणाले, ‘‘विज्ञान काय आहे, त्यात काय चालले आहे हे आपल्याकडे इंग्रजीतूनच सांगितले जाते. त्यामुळे महत्त्वाचा विषय असूनसुद्धा तो अधिक लोकांपर्यंत पोचत नाही. हा विचार समोर ठेवून मी विज्ञान मातृभाषेतून सांगण्याचा प्रयत्न सुरू केला. मराठीबरोबरच हिंदीतून विज्ञान कथा लिहू लागलो. वाचकांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. याचाच अर्थ वाचकांची ती गरज होती आणि आजही आहे. त्यामुळे नव्या पिढीतील लेखकांनी विज्ञानाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे. कथा-कादंबऱ्यांतून विज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवावे. पुढच्या काळात हे होईल आणि त्या माध्यमातून विज्ञान घरोघरी पोचेल, असा विश्वास वाटतो.’’

गणित, विज्ञानाची जुगलबंदी

आपण एखाद्या संगीत मैफलीत जुगलबंदी ऐकली असेल; पण आता शब्दांच्या माध्यमातून अतिशय अवघड समजल्या जाणाऱ्या गणित- विज्ञान या विषयांची जुगलबंदी अनुभवायला मिळणार आहे. ‘गणित-विज्ञानाची जुगलबंदी’ असेच या पुस्तकाचे नाव आहे. याविषयी डॉ. नारळीकर म्हणाले, ‘‘हे पुस्तक लिहून पूर्ण झाले आहे. ‘राजहंस’तर्फे लवकरच वाचकांसमोर येईल. हे दोन विषय एकमेकांना कशी मदत करतात, ते एकमेकांना कसे पूरक आहेत, त्यात बदल कसा होत गेला... हे मी त्यात मांडलेले आहे. ते वाचताना नक्कीच काही वैज्ञानिक आणि गणिततज्ज्ञही तुम्हाला भेटतील.’’

साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मला बोलावणे हा मोठा सन्मान समजतो; पण मी स्वतःला परिपक्व लेखक समजत नाही. खरं तर लेखक आहे की नाही, हे वाचकांनीच ठरवायचे असते.
- डॉ. जयंत नारळीकर, खगोलशास्त्रज्ञ

Web Title: dr. jayant narlikar speech