डॉ. दाभोलकरांचे विचार मारता आले नाहीत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर या व्यक्तीचा खून प्रतिगामी शक्तींनी केला असला, तरीही त्यांच्या विचारांचा ते मारू शकत नाहीत. गेल्या पाच वर्षांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शंभरावर वाढलेल्या शाखांमधून हाच निष्कर्ष ठळकपणे निघाला आहे. 

पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर या व्यक्तीचा खून प्रतिगामी शक्तींनी केला असला, तरीही त्यांच्या विचारांचा ते मारू शकत नाहीत. गेल्या पाच वर्षांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शंभरावर वाढलेल्या शाखांमधून हाच निष्कर्ष ठळकपणे निघाला आहे. 

२० ऑगस्ट हा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा हौतात्म्य दिन या वर्षीपासून राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय ‘ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क’ आणि ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने घेतला आहे. या दिवसाच्या पूर्वसंध्येला  ‘वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात वक्त्यांनी हे मत व्यक्त केले. यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर, डॉ. जयंत नारळीकर, सत्यजित रथ आणि डॉ. विवेक मॉटेरो यांनी विचार मांडले. 

दाभोलकर म्हणाल्या, ‘‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला त्या वेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या २१५ शाखा होत्या. गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांची संख्या ३२५ झाली आहे. यातील सगळी माणसे ही सामान्य आहेत. आपापली नोकरी, उद्योगधंदा सांभाळून काम करणारी ही लोकं आहेत.  वैज्ञानिक दृष्टिकोनाला धरून समाजिक प्रश्‍नांना कसे भिडायचे हे कार्यकर्त्यांना समजले आहे.’’  

‘‘डॉ. दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश हे समाजाला विचार करायला लावण्याचा वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत होते. त्यांना संपवण्यात आले. यापुढील काळातही असा प्रयत्न करणाऱ्यांना हा धोका राहील, ही जाणीव समाजात जागी राहील, असा प्रयत्न यामागे आहे. हे वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजविण्यापुढील मोठे आव्हान आहे,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘‘आजूबाजूला पाहतो तेव्हा असे वाटते अजूनही लोक १८ व १९व्या शतकातून बाहेर आलेले नाहीत. त्यांना आधुनिक गोष्टींमध्ये रस नसतो. विज्ञान अनेक आघाड्यांवर प्रगती करत आहे. त्याची प्रगती चालू असताना त्याचे पडसाद तंत्रज्ञानामध्ये उमटत आहेत. सगळेच विज्ञानाचे शोध कल्याणकारी नसतात. काही शोध दिसायला चांगले असतात, पण त्याचे दुष्परिणाम भयंकर असू शकतात. त्यामुळे विज्ञानाचा वापर योग्य करतो का, याची खात्री केली पाहिजे,’’ असेही त्यांनी सांगितले.

डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी सापडले ही समाधानाची गोष्ट आहे. त्याबद्दल तपास यंत्रणांचे अभिनंदन. लवकरच संपूर्ण कट उघडकीस येईल अशी अपेक्षा करुयात.
- डॉ. जयंत नारळीकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ

Web Title: Dr. narendra Dabholkar Thinking Anis