पुलंचे लेखन प्रत्ययकारी भूमिकेतून - डॉ. नरेंद्र जाधव

बालगंधर्व - पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीच्या सांगतेनिमित्त ‘ग्लोबल पुलोत्सवा’च्या समारोप सोहळ्यात डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते अशोक सराफ यांना पुलोत्सव जीवनगौरव आणि शरद पोंक्षे यांना विशेष सन्मान शुक्रवारी प्रदान करण्यात आला.
बालगंधर्व - पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीच्या सांगतेनिमित्त ‘ग्लोबल पुलोत्सवा’च्या समारोप सोहळ्यात डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते अशोक सराफ यांना पुलोत्सव जीवनगौरव आणि शरद पोंक्षे यांना विशेष सन्मान शुक्रवारी प्रदान करण्यात आला.

पुणे - ‘दलित साहित्याविषयी पु. ल. देशपांडे यांना प्रचंड आस्था होती. दलित साहित्यातून मांडले जाणारे जे दाहक वास्तव होते, ते वाचून पुलं तळमळून उठायचे. साहित्याची वर्गवारी मुळात पुलंना मान्य नव्हती, त्यामुळे कोणत्याही साहित्याविषयी रसग्रहणात्मक लेखन करताना ते समीक्षेच्या भूमिकेतून लिहीत नसत, तर प्रत्ययकारी भूमिकेतून लिहीत असत,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले.

पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीच्या सांगतेनिमित्त ‘पु. ल. परिवार’, ‘आशय सांस्कृतिक व स्क्वेअर’ने वर्षभर आयोजित केलेल्या ‘ग्लोबल पुलोत्सवा’च्या समारोप सोहळ्याचे उद्‌घाटन डॉ. जाधव यांच्या हस्ते झाले. या वेळी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पुलोत्सव जीवनगौरव आणि ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांना ‘विशेष सन्मान’ प्रदान करण्यात आला.

व्यासपीठावर लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे क्षेत्रीय प्रबंधक सुशील जाधव, व्ही. शांताराम फाउंडेशनचे प्रमुख किरण व्ही. शांताराम, आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, स्क्वेअरचे नयनीश देशपांडे आणि मयूर वैद्य, कॉसमॉस बॅंकेचे संचालक आणि कोहिनूर ग्रुपचे प्रमुख कृष्णकुमार गोयल आदी उपस्थित होते. 

जाधव म्हणाले, ‘‘अजातशत्रू, नर्मविनोदी, दातृत्व या अनेक अंगांनी पुलं आपल्याला भेटतात. ज्या ज्या दलित साहित्याला पुलंच्या प्रस्तावनेचा परीसस्पर्श झाला, ते साहित्य प्रचंड गाजले.’’ 

सराफ म्हणाले, ‘‘पुलंचा प्रत्यक्ष सहवास मला लाभला नाही. साहित्यातून पात्र उभे करण्याची त्यांची शैली अवगत करून मी ती माझ्या अभिनयाद्वारे चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न आजही करतो. मी पुलंचा एकलव्य आहे.’’

पोंक्षे म्हणाले, ‘‘या पुरस्काराने माझी जगण्याची उमेद वाढवली. आजाराला हसत हसत सामोरे गेल्यानेच आज पुलंच्या नावाचा विशेष सन्मान स्वीकारण्यासाठी मी आपल्यापुढे उभा आहे.’’

राज्यातील घडामोडींमुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील अनुपस्थित होते. त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे रसिकांशी संवाद साधला. चित्राव यांनी प्रास्ताविक केले. सुप्रिया चित्राव यांनी सूत्रसंचालन केले. सतीश जकातदार यांनी आभार मानले. यानंतर ‘पु. ल. - एक संचित’ हा पुलंच्याच रचनांचा कार्यक्रम झाला.

हजरजबाबीपणा अन्‌ चौफेर फटकेबाजी
‘आता तू माझ्या घरापर्यंत पोचला..., माझ्या नृत्याला तुम्ही नृत्य म्हणत असाल, तर मी खरोखर धन्य आहे... विनोदाचे टायमिंग शास्त्र आहे...’’ अभिनेते अशोक सराफ त्यांच्यावर बरसणाऱ्या प्रश्‍नांना तितक्‍याच हजरजबाबीपणाने उत्तरे देत रसिकांमध्ये हास्याचे फवारे निर्माण करत होते. 

मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी चौफेर फटकेबाजी केली. पुलंची कोणती पुस्तके आवडतात, हा प्रश्‍न पूर्ण होण्यापूर्वीच हा काय प्रश्‍न झाला का? असा प्रतिप्रश्‍न करत ‘आईला तुला कोणते मूल आवडते’ असे विचारण्यासारखे आहे, असे उत्तर देत सराफ यांनी रसिकांच्या मनाचा ताबा घेतला. पांडू हवालदार चित्रपट हिट झाल्यावर बॅंकेच्या नोकरीचा राजीनामा दिला. त्यापूर्वी सलग वर्षभर बॅंकेत गेलोच नव्हतो, असा गौप्यस्फोट करायला ते विसरले नाहीत. 

माझ्या अभिनयावर माझे मामा, ज्येष्ठ दिग्दर्शक गोपीनाथ सावकार यांचे संस्कार आहेत, त्यांच्याच तालमीत मी तयार झालो, असे एका प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले. ‘‘मामांमुळेच मला अभिनयाची गोडी लागली. डोळे, चेहरा यांचा अभिनयासाठी कसा वापर करायचा, हे त्यांच्याकडून शिकलो. 
मी तबला शिकलो नाही, पण मला रिद्‌मची प्रचंड जाण आहे, त्यामुळे तबल्यावर बोटे आपोआप चालतात. तो रिद्‌म मला अभिनयात विनोदाचे टायमिंग साधताना उपयोगी पडतो,’’ असे ते म्हणाले. निवेदिता जोशी यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला ‘तू आता माझ्या घरापर्यंत पोचला’ असे उत्तर देत हास्य निर्माण केले. सराफ यांनी राजा गोसावी, लक्ष्मीकांत बेर्डे, रंजना, नाना पाटेकर, माधुरी दीक्षित, अजय देवगण, शाहरूख खान यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com