Vetal Tekdi : वेताळ टेकडी संदर्भात नागरिकांचे आक्षेप व हरकती मागवण्याच्या सूचना; डॉ. नीलम गोऱ्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr neelam Gorhe statement Instructions citizens objections regarding Vetal tekdi

Vetal Tekdi : वेताळ टेकडी संदर्भात नागरिकांचे आक्षेप व हरकती मागवण्याच्या सूचना; डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : वेताळ टेकडी परिसरात विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा -हास होत आहे. या संदर्भात आत्तापर्यंत काय कार्यवाही केली याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे आज उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

वेताळ टेकडी परिसरात महापालिकेमार्फत होणार असलेल्या विविध विकासकामांमुळे व रस्ता तसेच बोगद्याच्या कामामुळे पर्यावरणाचा -हास होत असल्याबाबत लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्था आणि नागरिक यांनी डॉ. गोऱ्हे यांच्याकडे तक्रार केली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी याबाबतच्या सूचना संबंधितांना आज पत्राद्वारे केल्या आहेत.

यामध्ये त्यांनी सूचना करताना सांगितले की, " सदर परिसरात कोणत्याही प्रकारच्या वृक्षतोडीस परवानग्या देऊ नये. तसेच टेकडीवर वनविहार प्रकल्प राबविण्यात यावा. बोगद्याची अत्यंतिक आवश्यकता असल्यास याबाबतचे प्रारूप आराखडे वेबसाईट व प्रसिध्दीमाध्यमात प्रसिध्द करून त्यावर सर्वांचे आक्षेप व हरकती मागविण्यात याव्यात व त्यास व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी तसेच नदीकाठ विकसित करण्याबाबतही प्रारूप आराखड्यास व्यापक प्रसिध्दी देऊन नागरिकांचे आक्षेप व हरकती मागविण्यात याव्यात व विकासाची कामे करतांना पर्यावरणाचा -हास होणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात यावी.

काही कंत्राटदार अनेकदा तोडलेली झाडे माहित होऊ नयेत म्हणून तोडलेल्या झाडांवर माती टाकून ती पुरून टाकण्याचा प्रकार करीत आहेत. अशा कंत्राटदारांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. तसेच या सर्व घटनेबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आपल्या कार्यालयास सादर करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या" असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

" विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी वेताळ टेकडी येथे होऊ घातलेल्या रस्त्याच्या अनुषंगाने आणि एकूणच पर्यावरणाला धोका पोहचवून होत असलेले प्रकल्प याच्या विरोधात ठाम भूमिका घेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठवलं आहे. पुणे शहरातील नैसर्गिक वारसा जतन झाला पाहिजे आणि महानगरपालिकेने लोकांना विश्वासात घेत कारभारात पारदर्शकता आणली पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. त्या बद्दल वेताळ टेकडी बचाव कृती समिती कडून आम्ही डॉ. गोऱ्हे यांचे मनापासून आभार व्यक्त करतो".

- सुष्मा दाते,माधवी राहिरकर, अमेय जगताप सदस्य वेताळ टेकडी बचाव कृती समिती.