...हात थरथरत होते, पण शब्द अन्‌ अनुभवांचा हिमालय तिथे बरसतच राहिला ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr S B Mujumdar

वयाच्या ८६ व्या वर्षीदेखील डॉ. मुजुमदार यांनी तितक्‍याच ताकदीने भारतीय विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जाण्याची परवड थांबवावी, असे साकडे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच घातले.

...हात थरथरत होते, पण शब्द अन्‌ अनुभवांचा हिमालय तिथे बरसतच राहिला !

पुणे - त्यांचे हात-पाय थरथरत होते, तरीही ते काही दशकांच्या अनुभवाच्या खंबीर पायावर ते उभे होते, न थकता, न थांबता. एवढेच काय त्यांचे शब्दही त्यांच्यासारखेच तितकेच धीरोदात्त होते, न थकणारे अन्‌ न थांबणारे...भारतीय-परदेशी विद्यार्थ्यांच्या (Students) उज्ज्वल भविष्यासाठी (Future) आपले अवघे आयुष्य खर्ची घालणारी ती व्यक्ती होती हाडाचे शिक्षक डॉ. शां. ब. मुजुमदार. (Dr. S. B. Mujumdar)

वयाच्या ८६ व्या वर्षीदेखील डॉ. मुजुमदार यांनी तितक्‍याच ताकदीने भारतीय विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जाण्याची परवड थांबवावी, असे साकडे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच घातले. डॉ. शां.ब. मुजूमदार या चिरतरुणाला, त्यांच्या जिद्दीला उपस्थित हजारो विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी, अन्य विद्यापीठांच्या कुलगुरूंनी तब्बल पाच मिनिटे टाळ्यांच्या कडकडाटात आणि उभे राहून सलाम केला ! एवढेच काय, दस्तुरखुद्द पंतप्रधान मोदी हे देखील डॉ.मुजुमदार यांच्या भाषणाने भारावल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होते.

हेही वाचा: ...म्हणून मलाही पुण्यात राहायला यावेसे वाटतेय - रामदास आठवले

लवळे येथील ‘सिंबायोसिस आरोग्य धाम’च्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान आले होते. मुजुमदार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधान कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. ठरल्याप्रमाणे ‘सिंबायोसिस’चे संस्थापक-अध्यक्ष या नात्याने डॉ. मुजुमदार हे प्रास्ताविकासाठी उठले. त्यांच्या मनात भारतीय, परदेशी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल असणारी कळकळ त्यांच्या भाषणातील मुद्‌द्‌यांमधून स्पष्ट होत होती. डॉ. मुजुमदार एक-एक मुद्दा मांडत असताना पंतप्रधान मोदी हे देखील ते मुद्दे आवर्जून ऐकत होते. ‘‘भारतीय डॉक्‍टर हे जागतिक दर्जाचे आहेत. त्यांच्या हातामध्ये वेगळीच जादू आहे. देशाला अधिक डॉक्‍टरांची गरज आहे. परंतु देशातील वैद्यकीय शिक्षण महागले आहे. परिणामी हे शिक्षण न परवडणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यावर सरकारने उपाय शोधायला हवा. पंतप्रधानांनी वैद्यकीय क्षेत्रावर काम करण्याची गरज आहे.’’ असा उपाय त्यांनी सुचविला.

दरम्यान, वयोमानामुळे त्यांचे शरीर काही प्रमाणात थकले असल्याने भाषण करताना त्यांचे हात, पाय थरथरायला लागले. परंतु आपली भूमिका मांडणार नाहीत, ते डॉ. मुजुमदार कसले. हात, पाय थरथरत असले तरीही डॉ. मुजुमदार थांबले नाहीत. त्यांचा अनुभवसमृद्ध वारसा ते मांडतच राहिले. दरम्यान, आपल्या वडिलांकडे पाहून डॉ.मुजुमदार यांच्या कन्या डॉ. विद्या येरवडेकर या आपल्या खुर्चीवरून उठून डॉ. मुजूमदार यांच्या मागे येऊन उभ्या राहिल्या. त्यांना बसण्यासाठी खुर्चीचा आग्रह केला. तरीही डॉ.मुजुमदारांनी आपल्या भाषणातून शिक्षणाबद्दल त्यांच्या मनात असणारी आस्था, कळकळ व्यक्त करत होते. त्यानंतर कन्येच्या आग्रहाखातर ते खुर्चीवर बसले, परंतु दरम्यान बोलणे सुरूच होते. हा क्षण आपल्या डोळ्यांमध्ये टिपणाऱ्या हजारो उपस्थितांनी डॉ. मुजुमदार यांचे भाषण सुरू असतानाच क्षणार्धात टाळ्यांचा कडकडाट केला, एवढेच नव्हे, तर त्यांना उभे राहून त्यांच्या शिक्षणाप्रतीच्या उर्जेला सलाम केला.

Web Title: Dr Sb Mujumdar Talking About Indian Students Future

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Indiapunestudent
go to top