महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सचिव  डॉ.विकास आबनावे यांचे निधन

aabnave passes away
aabnave passes away

पुणे - महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सचिव आणि शहर काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस, सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ.विकास मारुतराव आबनावे यांचे आज (गुरुवार) निधन झाले. ते ६१ वर्षे वयाचे होते. डॉ. आबनावे यांना कोरोनाची लागण झाल्याने पाच दिवसांपूर्वी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खालावत चालली होती. सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आणि माजी आमदार मोहन जोशी, पुणे शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रमेश बागवे, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे आदिंनी डॉ. आबनावे यांना श्रद्धांजली वाहिली.

मासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि शिक्षणाची व्यवस्था आबनावे परिवाराने महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या माध्यमातून ९३ वर्षांपूर्वी सुरु केली. त्या संस्थेची धुरा अत्यंत समर्थपणे डॉ. विकास आबनावे सांभाळत होते. याशिवाय प्रथमेश एज्युकेशन अँड कल्चरल ट्रस्ट, सहवास चॅरिटेबल ट्रस्ट, इंडियन बोर्ड ऑफ हेल्थ एज्युकेशन अँड रिसर्च, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नारायण मेघाजी लोखंडे प्रतिष्ठान, सी.एस.मेडिकल कॉलेज ऑफ योग अँड नचरोपथी, मोरया सामाजिक प्रतिष्ठान (चिंचवड), प्रोफेशनल एज्युकेशन अँड मॅनेजमेंट, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ योग अँड नॅचरोपथी, पुणे मेडिकल ट्रान्सक्रिप्शन इंस्टिट्यूट, सरस्वती मेडिकल फाउंडेशन आदी संस्थांचे ते पदाधिकारी होते. 

आबनावे यांनी वैद्यकीय आणि योग या विषयांवर सहा पुस्तके लिहिली असून अलिकडेच स्वर्गीय बाबू जगजीवन राम यांच्या जीवनावर आबनावे यांनी पुस्तक लिहिले. अध्यात्म नाथसंप्रदाय, योग, वैद्यकशास्त्र, शिक्षण आदी विषयांवर त्यांनी देशविदेशात व्याख्याने दिली आहेत. कुटुंब नियोजन या विषयावरही त्यांनी झोपडपट्ट्या आणि वस्त्यांमध्ये बाराशे व्याख्याने देऊन जनजागृती केली. ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शवरही त्यांची व्याख्याने झाली. त्यांच्या चर्चासत्रातही त्यांचा सहभाग होता. 

काँग्रेस पक्षाच्या शिबीरांमधून त्यांनी राज्यभर व्याख्याने दिली आहेत. गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ या ठिकाणी त्यांची दोनशे व्याख्याने झाली. आदर्श सामाजिक कार्यकर्ता, भारतीय दलित साहित्य अकादमीचे महात्मा ज्योतिबा फुले सुवर्णपदक, बाबू जगजीवन राम प्रतिष्ठान नवी दिल्ली यांचे सामाजिक कार्याबद्दलचे सुवर्णपदक आदी पुरस्कार डॉ. आबनावे यांना प्राप्त झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com