Video : पुण्यातील शांतीनगर वसाहतीतील रहिवाशांचा संसार पाण्यात

ज्ञानेश सावंत
रविवार, 4 ऑगस्ट 2019

- शांतीनगर वसाहतीत रात्रीपासूनच गुडघाभर पाणी साचले होते.
- शेजारच्या नदीतील पाण्याच्या जोरामुळे फुटलेल्या गटाराचे आहे.
- या पाण्यात कित्येकांचे संसार वाहून गेले.
- अस्वच्छ पाण्यामुळे आजारी पडण्याची वेळ येथील नागरिकांवर आलेली आहे.

पुणे : ''माझ्या मुलाला फिट येते...तो झोपुन असतो, आम्ही दोघी बहिणी थकलेलो आहोत. घरात रात्री पाणी शिरले आहे. आम्ही ना साहित्य उचलू शकलो, ना घराबाहेर पडू शकलो. त्यामुळे आमचा संसार पाण्यात गेला. येरवड्यातील शांतीनगरमधील आजीबाई सांगत होत्या.

शांतीनगर या भागात रात्रीपासूनच गुडघाभर पाणी साचले होते. सकाळी हे पाणी वाढून कमरेपर्यंत आले आहे. हे पाणी पावसाचे नाही तर, शेजारच्या नदीतील पाण्याच्या जोरामुळे तुंबलेल्या गटाराचे आहे. या पाण्यात कित्येकांचे संसार वाहून गेले. आधीच संसार वाहून गेलेत, आता अस्वच्छ पाण्यामुळे आजारी पडण्याची वेळ येथील नागरिकांवर आलेली आहे.

शांतीनगर वसाहतीतील 250 घरांमध्ये पाणी शिरले असून गेले 6 ते 8 तास झाले हीच स्थिती आहे, अद्याप  येथे कोणतीही महापालिका यंत्रणा पोहचलेली नाही. स्थानिक रहिवाशांनी काहींचे संसार वाचविण्याचा प्रयत्न केला. दाटीवाटीचे घर आणि पाण्याचा वाढता जोर त्यामुळे तेही शक्य झाले नाही. दरम्यान पुण्यातील शांतीनगर भागातील रहिवासी महापुराचा अनूभव घेत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drainage water flows into Shantinagar of Pune