आरोग्य उपकेंद्रासमोरच गटाराचे पाणी

चिंतामणी क्षीरसागर
रविवार, 18 ऑगस्ट 2019

वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील बाजारतळावरील गटार तुंबल्याने पाणी रस्त्यावर येते. येथील आरोग्य उपकेंद्राच्या प्रवेशद्वारावर पाणी साठून राहिल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

वडगाव निंबाळकर (पुणे) : वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील बाजारतळावरील गटार तुंबल्याने पाणी रस्त्यावर येते. येथील आरोग्य उपकेंद्राच्या प्रवेशद्वारावर पाणी साठून राहिल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

येथील गणपती मंदिरापासून ओढ्यापर्यंत सुमारे शंभर मीटरचे उघडे गटार आहे. या भागात खडक असल्याने येथे भूमिगत गटार झाले नाही. आरोग्य उपकेंद्राच्या प्रवेशद्वारावर सिमेंट पाइप टाकून पाणी पुढे ओढ्यात सोडले आहे. गेल्या महिनाभरापासून पाइपमध्ये कचरा अडकून पाइप तुंबला. परिणामी, गटराचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. बाजाराच्यादिवशी याच उघड्या गटाराच्या पाण्यालगत खाद्यपदार्थांची दुकाने लावली जातात.

बाजारासाठी आलेल्या नागरिकांना नाक मुठीत धरून येथून जावे लागते. गटाराच्या सांडपाण्याबाबत अनेक वेळा व्यावसायिकांनी ग्रामपंचायतीला कळविले; पण दुरुस्ती झाली नाही. आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांनीही ग्रामपंचायतीला लेखी निवेदन दिले; पण काहीच उपयोग झाला नाही. ग्रामपंचायतीचा कर भरूनही बाजारातील व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागतो. सांडपाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना ग्रामपंचायत प्रशासन ढिम्म आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी व्यावसायिक आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drainage Water In Front Of Helth Subcenter