नाटकाचा पडदा लवकरच उघडणार; कसा तो वाचा सविस्तर

dra.jpg
dra.jpg

पुणे : लॉकडाउनमुळे नाटकांचा बंद झालेला पडदा आता 'ओटीटी' या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उघडणार आहे. नाट्य क्षेत्राने त्याची तयारी सुरू केली असून, संकेतस्थळावर नाट्यप्रयोगही सुरू झाले आहेत.

चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद झाली. पण चित्रपटांना टीव्ही आणि नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, झी फाइव्ह, एमएक्स प्लेअर हे ऑनलाइन (ओटीटी) पर्याय उपलब्ध होते. नाटक मात्र नाट्यगृहात अडकले होते. पण लॉकडाऊनच्या काळातील तात्पुरता पर्याय म्हणून नाटकांचे ऑनलाइन प्रयोग सुरू झाले आहेत. त्यामुळे पुढील काळात नाट्यगृहातील प्रत्यक्ष नाटक आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरील नाटक असे दोन्ही पर्याय प्रेक्षकांसमोर असतील.

अनेक निर्माते हे सध्या असलेल्या ओटीटीवर मराठी नाटक आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर काही जणांनी वेगळे पर्याय निवडले आहेत. अभिनेता ह्रषीकेश जोशी यांनी 'नेटक डॉट लाइव्ह' हा उपक्रम सुरू करून नाटकाचे ऑनलाइन प्रयोग सुरू केले आहेत. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी एका संकेतस्थळाच्या माध्यमातून 'हसगत'चा प्रयोग केला. त्याला नाट्यरसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
नाटक ही प्रत्यक्ष रसिकांसमोर सादरीकपणाची कला आहे. ती नाट्यगृहातच फुलते, असे नाट्य क्षेत्रातील कलाकार मानतात. परंतु नाट्यक्षेत्राला चालना देण्यासाठी किंवा वेगळा प्रयोग म्हणूनही मराठी नाटक ओटीटी प्लॅटफॉर्मवर सादर झाले पाहिजे, असे मत या क्षेत्रातील कलाकार, दिग्दर्शक व्यक्त करीत आहेत.

परदेशात नाट्यगृहात नाटक सुरू असताना तेच लाइव्ह प्रसारित केले जाते. भारतातही तसा प्रयोग झाला पाहिजे. नाटक 'ओटीटी'वर आले पाहिजे. त्यामुळे नाटकाचा प्रेक्षकही वाढेल. ज्यांना नाट्यगृहात ज्यांना यायला जमत नाही, त्यांना घरी बसून तरी नाटकाचा आनंद घेता येईल. पण हा प्लॅटफॉर्म लाइव्ह नाटकाला पर्याय ठरू शकणार नाही. पूरक मात्र असेल.
- विजय केंकरे (दिग्दर्शक)

नाट्य क्षेत्र हे प्रवाही आहे. वेगवेगळे प्रयोग तिथे होतात. त्यामुळे मनोरंजनासाठी ओटीटी हे व्यासपीठ निर्माण झाले, तर त्यावरही नाटके आली पाहिजेत. तसेच अनेक जुनी नाटके, तरुण पिढीला पाहायला मिळाली नाहीत, त्याचा आस्वाद त्यांना ही नाटके पाहता येईल आणि या प्लॅटफॉर्मवर नाटकांचे डिजिटल रुपात जतन देखील होऊ शकेल.- प्रशांत दामले (अभिनेता)

नाटक हे प्रेक्षकांच्या साक्षीनेच झाले पाहिजे. पण आता नाट्य क्षेत्र आणि त्याचे अर्थकारण पूर्णत: थांबलेले आहे. कलाकार, तंत्रज्ञ, निर्माता यांच्याकडे काम नाही. त्यांचे जगणे आणि अर्थकारणाचा विचार झाला पाहिजे. त्यासाठी आता उपलब्ध असलेले ओटीटी, टिव्ही वाहिन्यांद्वारे नाटक सुुरू होऊन या क्षेत्राचे चक्र फिरले पाहिजे, असे वाटते. - चंद्रकांत कुलकर्णी (दिग्दर्शक)

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com