नालेसफाईवर अंकुश कुणाचा?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

पुणे - पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि पावसाळी गटारांतील गाळ काढण्याची कामे महापालिकेने सुरू केली आहे. मात्र ही कामे योग्य पद्धतीने होतात का नाही, हे पाहण्यासाठी यंत्रणा असल्याचे दिसून येत नाही. 

पुणे - पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि पावसाळी गटारांतील गाळ काढण्याची कामे महापालिकेने सुरू केली आहे. मात्र ही कामे योग्य पद्धतीने होतात का नाही, हे पाहण्यासाठी यंत्रणा असल्याचे दिसून येत नाही. 

पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रकार होतात. नाल्याजवळ असलेल्या वस्तीमध्ये पाणी शिरण्याच्या घटनाही घडतात. या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने पावसाळी गटारे आणि नालेसफाईचे काम मे महिनाअखेर पूर्ण करण्याचा दावा केला आहे. पाणी तुंबण्याची ठिकाणे शोधून प्राधान्याने ही कामे केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या कामासंदर्भात पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या आहेत. त्यानुसार काही ठिकाणी पावसाळी गटारे साफ करण्याचे काम सुरू केले आहे.

कसबा पेठेत गटारांच्या साफसफाईचे काम सध्या सुरू आहे. तसेच सिंहगड रस्ता परिसरात नाल्याची सफाई करण्याचे काम केले जात आहे. मात्र हे काम योग्य पद्धतीने होते की नाही; हे पाहण्यासाठी महापालिकेची यंत्रणा अस्तित्वात असली, तरी ती प्रत्यक्षात कार्यरत असल्याचे दिसत नाही.

नाले आणि पावसाळी गटारे सफाईच्या कामाची जबाबदारी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील एका अधिकाऱ्यावर देणे आवश्‍यक आहे. या अधिकाऱ्याने प्रत्यक्ष पाहणी करूनच अहवाल दिल्यानंतर या कामाची बिले काढली पाहिजेत. त्यानंतरही नाला आणि गटारे तुंबली, तर त्या अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे.
- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच

वळवाच्या पावसामुळे गाळ पुन्हा गटारांमध्ये
महापालिकेने ही कामे मे महिन्यापूर्वीच सुरू करायला हवीत. मेच्या दुसऱ्या पंधरवड्यात वळवाचा पाऊस कधीही पडतो. त्या वेळी गटार आणि नाल्यांतून काढलेला गाळ व कचरा हा शेजारी टाकला जातो. वळवाच्या जोरदार पावसामुळे काठावर ठेवलेला कचरा, गाळ पुन्हा नाल्यांत व गटारांत जातो. याकडे सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी लक्ष वेधले. या कामाची जबाबदारी निश्‍चित केली, तर ते योग्य दर्जाचे होईल, असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: dranage cleaning control garbage municipal