पैसा जाणार वाहून...

शंकरशेठ रस्ता - पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून गटारांची स्वच्छता करण्यात येत आहे. मात्र त्यातील गाळ रस्त्यावरच पडून असल्याने तो पुन्हा गटारात वाहून जाण्याची शक्‍यता आहे.
शंकरशेठ रस्ता - पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून गटारांची स्वच्छता करण्यात येत आहे. मात्र त्यातील गाळ रस्त्यावरच पडून असल्याने तो पुन्हा गटारात वाहून जाण्याची शक्‍यता आहे.

पुणे - हवामान खात्याचा अंदाज काहीही असो, पण पुण्यात यंदा धो-धो पाऊस होईल आणि रस्तोरस्ती पाणी नव्हे, तर कचरा, राडारोडा असेल याचा अंदाज महापालिकेला आला आहे. प्रशासनाने तो कचरा आणि राडारोडा उचलण्याचे ठरवतानाच पावसाळ्यात न करण्याच्या कामांच्याही निविदा काढल्या आहेत. तसेच प्रभागांत रंगरंगोटी करण्याचेही ठरविले आहे. महापालिकेच्या या अजब कारभारामुळे पुणेकरांचा पैसा पावसाच्या पाण्यात वाहून जाण्याची भीती आहे.

पावसाळ्यात खरे तर रस्त्यांचे काँक्रिटीकरण, पदपथ दुरुस्तीची कामे करायची नसतात, तरीही महापालिकेने नियम बाजूला सारत अशा डझनभर कामांच्या निविदा मागविल्या आहेत. कोथरुडमधील तीन प्रभागांत ही कामे करण्याची गरज असल्याचे क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. ऐन पावसाळ्यात रस्ते आणि पदपथांची दुरुस्ती होणार आहे.

पावसाळ्याआधी खबरदारीचा उपाय म्हणून ओढे-नाले, पावसाळी गटारांची सफाई सोडून कचरा, राडारोडा आणि रंगरंगोटीच्या कामांचे नियोजन केल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. कचरा, राडारोडा उचलण्याच्या कामांसाठी दीड कोटी रुपये खर्च होणार आहेत. ही कामे २५ लाखांपेक्षा कमी रकमेची असल्याने ती क्षेत्रीय कार्यालयांकडून होत असल्याचे सांगून महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हात झटकले. तर दरवर्षी ही कामे करण्यात येत असल्याचा दावा क्षेत्रीय कार्यालये करीत आहेत. 

पावसाळ्यात रस्त्यावरील पाण्याचा निचरा व्हावा आणि ओढ्या-नाल्यांत पाणी तुंबू नये म्हणून साधारणपणे १५ मेपर्यंत पावसाळी गटारे आणि ओढ्यांची सफाई अपेक्षित आहे. परंतु, आता कुठे कामांचा आढावा घेत ती करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्याआधी कामे होण्याची शक्‍यता नाही. त्यातच पावसाळ्यातील जी कामे करायची नसतात त्याच कामांच्या कोट्यवधी रुपयांच्या निविदा बुधवारी काढण्यात आल्या आहेत. 

या कामांच्या निविदा 
रस्त्यांचे काँक्रिटीकरण
पदपथ दुरुस्ती
ड्रेनेजलाइन टाकणे
ड्रेनेजलाइनवरील चेंबर दुरुस्ती
प्रभागातील भिंतीची रंगरंगोटी
पावसाच्या पाण्यात वाहून येणारा कचरा, राडारोडा उचलणे 

नगरसेवकांनी सूचविलेल्या कामांनुसार निविदा काढल्या आहेत. ही कामे पुढील सहा ते दहा महिन्यांत करायची आहेत. पावसाळ्याच्या दृष्टीने ती करणे अपेक्षित आहे.
- उमेश माळी, उपायुक्त, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com