सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामुळे हिरवाई  (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

सहकारनगर परिसरातील सुमारे पाच लाख लिटर सांडपाण्यावर दररोज प्रक्रिया करून त्याचा वापर तळजाई टेकडी व सदू शिंदे क्रिकेट स्टेडियमवरील झाडांसाठी केला जात आहे. तसेच, स्टेडियमच्या सुशोभीकरणासाठीदेखील हे पाणी वापरले जात आहे. शहरात पाण्याची टंचाई जाणवत असताना महापालिकेने बागूल उद्यानात उभारलेला हा प्रकल्प (ग्रे वॉटर) उद्यानासह टेकडीवरील झाडांसाठी संजीवनी ठरत आहे.

पुणे - सहकारनगर परिसरातील सुमारे पाच लाख लिटर सांडपाण्यावर दररोज प्रक्रिया करून त्याचा वापर तळजाई टेकडी व सदू शिंदे क्रिकेट स्टेडियमवरील झाडांसाठी केला जात आहे. तसेच, स्टेडियमच्या सुशोभीकरणासाठीदेखील हे पाणी वापरले जात आहे. शहरात पाण्याची टंचाई जाणवत असताना महापालिकेने बागूल उद्यानात उभारलेला हा प्रकल्प (ग्रे वॉटर) उद्यानासह टेकडीवरील झाडांसाठी संजीवनी ठरत आहे.

सहकारनगर परिसरातील सांडपाणी पाइपलाइनद्वारे बागूल उद्यानातील ग्रे वॉटर प्रकल्पात आणले जाते. त्या ठिकाणी या पाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर हे पाणी दहा अश्‍वशक्तीच्या मोटारीद्वारे तळजाई टेकडीवर नेले जात आहे. यासाठी अडीच किलोमीटर लांब पाइपलाइन टाकली आहे. या पाण्याच्या जोडीला राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलजवळील कात्रज येथून येणाऱ्या भूमिगत कालव्याचे सुमारे सात लाख लिटर पाणी उचलण्यात येते. यातून दररोज सुमारे 12 लाख लिटर पाणी तळजाई टेकडीवर नेले जाते. या पाण्यातून टेकडीवरील हिरवाई टिकून राहण्यास मदत होत आहे. 

पाणीटंचाईचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर होत असताना हा प्रकल्प तळजाई टेकडी व बागूल उद्यानातील झाडांसाठी वरदान ठरत आहे. त्यातून ऐन उन्हाळ्यात हिरवाई टिकविण्यास मदत होत आहे. या प्रकल्पात गांडूळ खताची निर्मितीही केली जात आहे. गेल्या तीन महिन्यांत सुमारे तीन टन नैसर्गिक खत या प्रकल्पातून मिळाल्याचे प्रकल्प अभियंता स्वप्नील पासगे यांनी सांगितले. 

सहकारनगर परिसरातील सांडपाण्याचा पुनर्वापर ग्रे वॉटर प्रकल्पाच्या माध्यमातून शक्‍य झाला आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करून बागूल उद्यान आणि तळजाई टेकडीवरील झाडे जगवणे शक्‍य झाले आहे. त्यातून पर्यावरणाचे संवर्धन करणे शक्‍य झाले आहे. 
- आबा बागूल, माजी उपमहापौर 

Web Title: Dranagewater Project Green Bagul Garden Water