पुराच्या पाण्याने  स्वप्नच उद्‌ध्वस्त 

aangre.jpeg
aangre.jpeg

पुणे ः मुलगा इंजिनिअरिंगला शिकतोय, परंतु सगळी पुस्तके पाण्यात भिजल्याने अभ्यासाला पुस्तकेही नाहीत आणि घरात जागापण नाही. राहायलाच जागा नाही, तर अभ्यास कुठे व कसा करणार? यामुळे मुलगा ऋषिकेशचे स्वप्नही पाण्यातच वाहून गेले आहे, अशी कैफियत मांडली आहे बोपोडी येथील आदर्शनगरमधील रहिवासी मीनाक्षी आंग्रे यांनी. पुराच्या पाण्यात सगळ्या संसारोपयोगी साहित्यासह मुलाचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दु:ख त्यांच्या डोळ्यांतून तरळत होते. 

गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही आदर्शनगरमध्ये राहत आहोत. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून विकसित करताना हा भाग पूररेषेत येत असल्याने प्रकल्पही रखडलेलाच आहे. त्यामुळे येथे घरे होणार नाहीत, असे सांगितले जात आहे, परंतु येथे नाही तर आम्हाला कुठेतरी जवळपास स्थलांतरित करावे. आम्हालापण चांगल्या घरात राहावं वाटतं, पण परिस्थितीच अशी आहे की काहीच करता येत नाही. 
नाइलाजाने झोपडपट्टीतच दिवस काढावे लागत आहेत, असेही आंग्रे यांनी सांगितले. 


आमच्यासह अनेक कुटुंबे येथून जवळपास स्थलांतरित होण्यास तयार आहेत, पण तशी व्यवस्थाच होत नाही. यापूर्वी 2005 मध्ये असेच पाणी आले होते, मात्र एवढी गंभीर पूरस्थिती झाली नव्हती. परंतु, या वर्षी काडी-काडीने उभा केलेला संसारच पुराने नष्ट केल्याने आम्ही पुरते कोलमडलो आहोत. 
ऋषिकेश आंग्रे याचे झालेले पुस्तकांचे नुकसान वीस ते पंचवीस हजारांपर्यंत आहे. घरची परिस्थिती हलाखीची आहे. वडील एका खासगी संस्थेत तुटपुंज्या पगारावर काम करतात. कष्टाने, जिद्दीने मुलाला चांगले शिक्षण देण्याच्या त्यांच्या स्वप्नावर पाणी पडले आहे. 
सगळा संसारच पाण्यात वाहून गेल्यामुळे त्यातून सावरण्यासाठी काही महिने लागणार आहे. त्यासाठी समाजातून दानशूर व्यक्तींनी शैक्षणिक कारणासाठी मदतीचा हात पुढे करण्यास हरकत नाही. 
 

""घरात पाणी शिरल्याने काहीही घेता आले नाही, अंगावरील कपड्यानिशी बाहेर पडावे लागल्याने अभ्यासासह अन्य संदर्भाची पुस्तके तशीच पाण्यात वाहून गेली. सध्या मी नऱ्हे येथे मित्राच्या खोलीत राहून त्याच्याच पुस्तकांचा वापर करून अभ्यास करत आहे. ही परिस्थिती खूपच भयानक असून, कुणावरही अशी वेळ येऊ नये.'' 
- ऋषिकेश आंग्रे, पूरबाधित 

-------------------------------- 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com