दुष्काळावर निधी खर्चाची बुद्धी दे - सुप्रिया सुळे

सासवड (ता. पुरंदर) - सरकार व पुरंदरच्या लोकप्रतिनिधीविरुद्ध टाळनाद आंदोलन करताना खासदार सुप्रिया सुळे व तालुक्‍यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते.
सासवड (ता. पुरंदर) - सरकार व पुरंदरच्या लोकप्रतिनिधीविरुद्ध टाळनाद आंदोलन करताना खासदार सुप्रिया सुळे व तालुक्‍यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते.

सासवड - ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुष्काळ सोडून सर्व विषयांवर बोलतात. आकाशवाणी, दूरचित्रवाणी, वर्तमानपत्रात जाहिरातबाजी तर चुकतच नाही. कराच्या रूपाने वसूल झालेला जनतेचा पैसा स्वतःच्या जाहिरातींसाठी खर्च करण्यापेक्षा दुष्काळ निवारणार्थ केल्यास जनतेला दिलासा मिळेल. देवा त्यांना तशी बुद्धी दे,’’ असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.

सासवड (ता. पुरंदर) येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आज राज्य सरकार व लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने टाळनाद आंदोलन करण्यात आले. त्याचे नेतृत्व करताना सुळे बोलत होत्या. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर कामठे, वैशाली नागवडे, प्रा. दिगंबर दुर्गाडे, विजय कोलते, माणिक झेंडे, गौरी कुंजीर, पुष्कराज जाधव, गौरी कुंजीर, राहुल गिरमे, बबन टकले, विराज काकडे, शिवाजी पोमण, नीलेश जगताप, हेमंतकुमार माहूरकर, सारिका इंगळे, बंडुकाका जगताप, ऋतुजा धुमाळ, अरुण जगताप, महेश जगताप, बाळासाहेब भिंताडे, मानसी जगताप आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. तहसीलदार अतुल म्हेत्रे यांनी सुळे यांच्याकडून मागण्यांचे निवेदन स्वीकारले. 

त्या म्हणाल्या, ‘‘राज्यात दुष्काळ असताना व इथले प्रश्न प्रलंबित हे (उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता) दुसऱ्या राज्यात मार्गदर्शन करायला गेलेत. राज्य सरकार कुंभकर्ण झालेय, असे म्हणताना खिशातल्या राजीनामावालेच ५० टक्के सरकारमध्ये भागीदार आहेत, हे ते कसे विसरतात. दुष्काळी मदत, कर्जमाफी, वीजबिल माफी, खड्डेमुक्त रस्ते अशा सर्वच आघाड्यांवर सरकार अपयशी आहे.’’ 

कामठे म्हणाले, ‘‘गुंजवणीचे पाणी आलेच नाही. चारपदरी रस्ता यांना करता आला नाही. कितीतरी कामांबाबत थापा मारणाऱ्या राज्यमंत्री विजय शिवतारेंवर कलम ४२० नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल का करू नये. येत्या विधानसभेला उमेदवारी अर्ज भरण्याएवढीही शिवतारेंची लायकी राहिली नाही.’’ 

या वेळी तालुक्‍यातील प्रशासकीय इमारत, पंचायत समिती स्थलांतर आदी कामे रखडल्याची टीका माणिक झेंडे यांनी केली.  

पुढारी, कार्यकर्त्यांनी धरला ताल
टाळनाद आंदोलनात सुप्रिया सुळे यांच्यासह सर्वांनी टाळ वाजवून भजन, भारुड गायिले. त्याबरोबर सरकारविरुद्ध पदे आळविण्यातही भजनी मंडळे व पुढारी, कार्यकर्ते कमी पडले नाहीत. जालिंदर कामठे, गौरी कुंजीर, दिगंबर दुर्गाडे यांनी सरकार व शिवतारे यांच्यावर टीका करीत, खंडोबाराय यांना बुद्धी दे. नाही तर यांना जाऊदे. पुढील वर्षी राष्ट्रवादीचा आमदार होऊदे, असे ताल धरत सांगितले.

पुरंदरची इमारत का थांबली
पुरंदरच्या प्रशासकीय कार्यालयाची इमारत होण्यासाठी मी चारवेळा पत्र दिले, पण सरकार काहीच करीत नाही. जिल्ह्यातील विरोधी आमदार असलेल्या इंदापूर व इतर तालुक्‍यांतही प्रशासकीय कार्यालयाच्या इमारती झाल्या. मग पुरंदरची इमारत का थांबली. राष्ट्रवादीचा आमदार असतो, तिथेच इमारत लवकर होते, असा टोला नाव न घेता शिवतारेंना सुप्रिया सुळे यांनी लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com