पुणे जिल्हा आत्तापासूनच तहानलेला

पुणे जिल्हा आत्तापासूनच तहानलेला

खेडमध्ये भाताचे उत्पादन घटणार
भोरगिरी - भोरगिरी (ता. खेड) परिसरात अखेरच्या टप्प्यात भातपिकाला पावसाने दगा दिल्याने उत्पन्नात तीस ते चाळीस टक्के घट येण्याची शक्‍यता आहे. पावसाअभावी रब्बी हंगामही वाया जाणार आहे. 

दोन दिवसांपासून भातकाढणीची कामे सुरू झाली. या वर्षी भाताच्या ओंब्या पूर्णपणे भरल्या नाही. त्यात पाखड (न भरलेले दाणे) जास्त आहेत. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. भातपीक चांगले आले, तरच आदिवासींचे संपूर्ण वर्ष चांगले जाते. या वर्षी गतवर्षीच्या तुलनेत उत्पादन कमी होणार आहे. भातसाळींचा दर्जाही चांगला नाही. तालुक्‍याच्या भोरगिरी परिसर, पाईट कुडे आणि वांद्रे परिसरातही हीच स्थिती आहे. इंद्रायणी, रायभोक आणि खडक्‍या या प्रसिद्ध सुवासिक जातींचे उत्पादन येथे घेतले जाते. भातकाढणीनंतर रब्बी हंगामात वाटाणा, हरभरा, मसूर यांसारखी कडधान्याची पिके खाचरातील पाण्याच्या ओलीवर घेतली जातात. या वर्षी ही पिके घेतली जाणार नाही. भातपीक असमाधानकारक आल्याने आदिवासी बांधवात नाराजी आहे.

इंदापूर तालुक्यात विहिरी खोलवर 
वडापुरी - वडापुरी (ता. इंदापूर ) परिसरात या वर्षी परतीच्या पावसाने पाठ फिरविल्यामुळे दुष्काळाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने विहिरीचे पाणी आटले आहे. परिसरात शेतीच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनला असल्याने नागरिकांना दुष्काळाला सामोरे जावे लागत असल्याची परिस्थिती पाहावयास मिळत आहे. 

या वर्षी समाधानकारक पाऊस तर सोडा; परंतु परतीचा पाऊससुद्धा झाला नसल्याने यंदाचा उन्हाळा कडक जाणार असल्याचे चित्र आत्तापासूनच जाणवू लागले आहे. त्यामुळे पाणी व चारा इत्यादीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. पाऊस झाला नसल्याने शेटफळ हवेली तलाव, तरंगवाडी तलाव, वडापुरी तलाव सध्या कोरडे पडले आहेत. त्यामुळे बऱ्याच गावात पाणीटंचाई जाणवू लागली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

या वर्षी पाऊस झाला नसल्याने दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. विहिरींनी तळ गाठला असल्याने पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्‍न भेडसावत असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. 

जुन्नर तालुक्यात कागदोपत्री सुकाळ
जुन्नर - भौगोलिकदृष्ट्या तीन भागात विभागल्या गेलेल्या जुन्नर तालुक्‍याचे पर्जन्यमानदेखील असेच विभागलेले पाहायला मिळते. पश्‍चिम आदिवासी भागात जास्त तर मध्यभागात बऱ्यापैकी तर पूर्वभागात अत्यंत कमी अशा उतरत्या श्रेणीने दरवर्षी पाऊस होत असतो. या वर्षीहीदेखील असेच चित्र आहे. तालुक्‍यातील महसुलाच्या नऊ मंडल विभागातील पर्जन्यमापकावर नोंदविलेल्या पावसाच्या आकडेवारीच्या आधारे तालुक्‍यात सरासरीच्या १०४.६६ टक्के पाऊस झाल्याने सरकारच्या दुष्काळी तालुक्‍याच्या यादीत जुन्नरचे नाव आले नाही. 

या वेळी सरकारने दुष्काळाचे निकष बदलून उपग्रहाद्वारे सर्वेक्षण केले असले तरी पावसाच्या प्रमाणाचा निकषही लावला आहे. जुन्नर तालुक्‍याची पावसाची सरासरी ७५० मिलिमीटर असून, या वर्षी ७८५.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती नसल्याचे समजून तालुक्‍याला यादीतून वगळले गेले आहे. 

येडगाव, वडज, माणिकडोह, पिंपळगावजोगा, चिल्हेवाडी या पाच धरणांबरोबर अनेक कोल्हापुरी बंधारे, पाणी साठवण तलाव तालुक्‍यात असताना ऑक्‍टोबरच्या सुरवातीलाच पूर्व भागातील शिंदेवाडी, पेमदरा या दोन गावांसह परिसरातील वाड्याची टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी झाल्याने तालुक्‍याचे नाव दुष्काळी यादीत नसल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

तालुक्‍याला संभाव्य दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागणार असल्याने लोकप्रतिनिधी व प्रशासनाने आतापासून तयारीला लागण्याची गरज आहे. आमदार शरद सोनवणे व अधिकारी वर्गाने पूर्व भागाचा दौरा करून परिस्थिती जाणून घेतली आहे. पश्‍चिम आदिवासी भागाचा दौरा होणार आहे. १५ नोव्हेंबरला पिकाची आणेवारी जाहीर होईल. या वेळी गावनिहाय योग्य आणेवारी लागणे गरजेचे आहे. यामुळे खरीप व रब्बी हंगामातील पीक पाण्याचा परिस्थितीनुसार तालुक्‍याला दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली करणे भाग पडेल, असे चित्र आहे.

जुन्नर तालुक्‍यातील पावसाची आकडेवारी (मिलिमीटरमध्ये)

मंडळ -        पडलेला पाऊस -         टक्के -         पावसाचे दिवस

जुन्नर  -             ४५८     -          २७६.६        - ३८
नारायणगाव -       २८५ -              २०४.१         - ३०
वडगावआनंद -     १५३                - ८६.१          - १२
निमगावसावा -       ४००              - ३२४.२          - २६
बेल्हे -              ४७२                - ३९६.२          - २७
राजूर -              २५२५               - १४६१           - ६४
डिंगोरे-             ११४७                - ६८३.६           - ६०
आपटाळे-         १२२१                 - ६६८.३            - ५२
ओतूर -           ४०५                   - २९४.६            - ३५

एकूण -            ७८५.५                 - १०४.६६         - ६६

वडगाव आनंद मंडळात कमी पाऊस
जुन्नर तालुक्‍यात जून ते सप्टेंबरअखेर चार महिन्यांत ६६ दिवस पावसाचे असले तरी हा पाऊस प्रामुख्याने राजूर, डिंगोरे, आपटाळे या आदिवासी भागातील मंडळात झाला आहे. वडज, माणिकडोह व पिंपळगावजोगा या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक दिसत आहे. सर्वांत कमी पाऊस वडगाव आनंद मंडळ विभागात नोंदला गेला आहे. सर्वाधिक राजूरला येथे झाला आहे. 

खरीप उत्पन्नात घट, रब्बी धोक्‍यात
परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील भात, सोयाबीन, भुईमूग आदी पिकांच्या उत्पादनात ४० ते ५० टक्के घट आली आहे. आदिवासी भागातील भातपीक जळून गेले आहे. यामुळे वर्षभराच्या उदरनिर्वाह करण्याचे हातातोंडाशी आलेले साधनच आदिवासी शेतकऱ्यांचा हातून निघून गेले आहे. आता वर्षभर आर्थिक घडी कशी बसवायची असा प्रश्न पडला आहे. खरीप हंगामाची अशी स्थिती असताना पावसाअभावी रब्बी हंगामदेखील धोक्‍यात आला आहे. पूर्व भागात रब्बीच्या पेरण्या वाया गेल्या असून, पाणी आणि चारा या दोन्ही समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. चारा व पाण्याअभावी काहींनी आपली जनावरे इतरत्र पाठविण्याची तयारी केली आहे. 

बारामती तालुक्यात दुष्काळाच्या झळा 
शिर्सुफळ : बारामती तालुक्‍यातील गाडीखेलसह परिसरात दिवसेंदिवस दुष्काळाच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत.

या पार्श्‍वभूमीवर बारामतीचे तहसीलदार हनुमंत पाटील यांनी गावाला भेट देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली. या वेळी पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनल्याने ग्रामस्थांनी पाण्याचा टॅंकरही सुरू करण्याची मागणी केली आहे.

सरपंच बाळासाहेब आटोळे, ग्रामपंचायत सदस्य शरद शेंडे, मंडल कृषी अधिकारी पी. एस. जगताप, महसुलचे मंडलाधिकारी शिवराम जेष्ठवाड, कृषी पर्यवेक्षक यू. जे. देशमुख आदी या वेळी उपस्थित होते.

बारामती तालुक्‍याच्या अनेक भागात ऐन पावसाळ्यात पावसाने हुलकावणी दिल्याने ऑक्‍टोबर महिन्याच्या सुरवातीपासूनच दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचे गाडीखेल येथील नागरिकांनी सांगितले.

या वेळी गाव कामगार तलाठी प्रियांका टिळेकर, ग्रामसेवक प्रदीप बनसुडे सुभाष शेंडे, मोहन पोमणे, अनिल आटोळे, रमेश पोमणे, शंकर आटोळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅंकर सुरू करण्याची मागणी
सध्या परिसरात पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्‍न गंभीर बनला आहे. त्यासाठी सरकारने त्वरित पाण्याचे टॅंकर सुरू करावेत, अशी मागणी गाडीखेलचे सरपंच बाळासाहेब आटोळे व ग्रामस्थांनी तहसीलदार हनुमंत पाटील यांच्याकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com