#MedicineIssues बिलाशिवाय औषधांचा ‘सौदा’

#MedicineIssues बिलाशिवाय औषधांचा ‘सौदा’

पुणे - औषधाचे बिल घेतले तर लाख-सव्वा लाख आणि बिलाशिवाय घेतल्यास ८० हजार, असा ‘सौदा’ पुण्यातील औषध विक्रेते रुग्णांच्या नातेवाइकांशी खुलेआम करत आहेत. अर्थात, ४० ते ४५ हजार रुपयांची बचत होत असल्याने सहाजिकच बिलांशिवाय औषध खरेदीस ग्राहकही प्राधान्य देतो. पण, त्यानंतर औषधे परत करताना आपली फसवणूक झाल्याची भावना ग्राहकांमध्ये निर्माण होत असल्याचे दिसून येते.

शहराच्या मध्यवस्तीतील एका रुग्णालयात कर्करोगाच्या रुग्णावर उपचार सुरू होते. त्यासाठी भली मोठी औषधांची यादी डॉक्‍टरांनी दिली. रुग्णालयाच्या जवळूनच या औषधांची खरेदी केली होती. यादीतील एका औषधाची खरेदी करताना बिलासह आणि बिलाशिवाय असे दोन पर्याय औषध विक्रेत्याने सांगितले. या दोन्ही किमतीमध्ये ४० ते ४५ हजारांचा फरक होता. ‘औषध तेच, फरक फक्त बिलाचा,’ अशी पुष्टीही विक्रेत्याने जोडली. पैशांची बचत होत असल्याने बिलाशिवायचा पर्याय रुग्णाच्या नातेवाइकाने निवडला. या ट्रिपमधील एक गोळी दिली. पण, त्यानंतर काही तासांतच रुग्णाचा मृत्यू झाला. हे औषध परत करताना आता बिलाशिवाय परत कसे घेणार, असा सवाल औषध विक्रेत्याने ग्राहकाला केल्याची माहिती पुढे आली आहे.

आपण फसले गेलो...
होता-नव्हता तेवढा सर्व पैसा ४५ व्या वर्षांत कर्करोगाशी लढणाऱ्या पतीच्या उपचारासाठी खर्च केला. दाग-दागिने तर केव्हाच विकले. उरले-सुरले डोक्‍यावरचे छप्परही गहाण टाकले... फक्त एकच इच्छा होती की, ‘ते’ वाचले पाहिजे. त्यानंतर गेलेले सर्व परत मिळवता येईल... हा विश्‍वास वाटतं होता. दैवाला ते मान्य नव्हते. पती वाचले नाहीत. आता पैशांची चणचण भासू लागली. त्यांच्या उपचारांसाठी घेतलेली औषधे त्याच दुकानात परत देऊन काही पैसे मिळावे म्हणून प्रयत्न केला. औषध विक्रेत्यांनी परतीचा रस्ता दाखविला. कारण, ही औषधे बिलावर घेतली नसल्याने परत घेणार नाहीत... पती गेल्याच्या दुःखात असलेली पत्नी बोलत होती. त्यांना पती गेल्याचे दुःख होतेच; पण, आता यात आपण फसले गेलो आहोत, याचेही शल्य टोचत आहे. 

ग्राहकांनी कोणतेही औषध खरेदी करताना बिल घेणे आवश्‍यक आहे. एकदा खरेदी केलेल्या औषधाची गोळी घेतल्यानंतर उर्वरित गोळ्या परत घेण्याची कोणतीही तरतूद कायद्यामध्ये नाही.
- अनिल बेलकर, सचिव, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्‍ट

बिलासह आणि बिलाशिवाय अशा पद्धतीने औषधांची विक्री करता येत नाही. त्यामुळे ग्राहकांना औषध देताना विक्रेत्यांनी विक्री केलेल्या प्रत्येक औषधाचे बिल दिलेच पाहिजे.
- विद्याधर जावडेकर, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com