#DrunkAndDrive मद्यपी सुसाट..ऽऽऽ

Drunk-And-Drive
Drunk-And-Drive

पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडी वाढत असताना वाहतूक नियमांचा भंग करण्याचे प्रमाणही वाहनचालकांकडून वाढल्याचे समोर आले आहे. वाहतूक नियमभंगाचे दररोज सुमारे ६० खटले मोटार वाहन कायदा न्यायालयात दाखल होत आहेत. विशेष म्हणजे, यातील ८० टक्के खटले हे मद्य पिऊन वाहन चालविण्याचे (ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह) आहेत.

न्यायालयात १ मार्च २०१८ ते या वर्षी ३१ फेब्रुवारीअखेर २१ हजार ५०० खटले दाखल झाले आहेत. त्यातील ११ हजार दावे निकाली काढण्यात आले असून, बेशिस्त वाहनचालकांकडून २१ कोटी २५ लाख ५० हजार ३५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यातील सर्वाधिक दावे हे मद्य पिऊन वाहन चालविण्याचे आहेत. मद्य पिऊन निष्काळजीपणे वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, लेन कटिंग, झेब्रा क्रॉसिंगवर थांबणे, राँग वे, हेल्मेट न घालणे, सीटबेल्ट न लावणे अशा प्रकारचे पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कार्यक्षेत्रातील तडजोड व विनातडजोड पात्र दावे न्यायालयात दाखल होतात. 

मद्य पिऊन वाहन चालविण्याचा गुन्हा हा तडजोडपात्र नसून, संबंधित वाहनचालकावर दोषारोपत्रसह खटला दाखल केला जातो. इतर प्रकरणे वाहतूक पोलिसांकडे दंड दिल्यानंतर जागेवर मिटविली जातात. गुन्हा कबूल नसल्यास ते प्रकरण न्यायालयात पाठवले जाते. मद्याच्या नशेत वाहन चालवताना पकडल्यानंतर होणारी कारवाई, निलंबित किंवा रद्द होणारा परवाना आदी कारवाया मद्यपींना अद्याप लागू पडल्या नसल्याचे नियमभंगाच्या वाढत चाललेल्या आकडेवारीतून स्पष्ट होते.

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर दंड भरण्याची वेळ आल्यानंतर अनेकांना गुन्हा मान्य नसतो. त्यामुळे प्रकरण न्यायालयात पाठवा, अशी मागणी अनेक वाहनचालक करतात. वाहतुकीचे नियम पाळण्याची प्रवृत्ती वाढायला हवी, अन्यथा रस्त्यावर चालणेही अवघड होईल. 
- पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com